बुलडाणा: बाल साहित्य रुजविण्यासाठी काही प्रयत्न केले नाही, तर २० वर्षांनी मराठी साहित्य बंद पडेल. त्यामुळे साहित्य संमेलनांची गरज निर्माण झाली आहे. बालसाहित्याला मान देणं, त्याची पेरणी करणं गरजेच आहे. त्यानुषंगाने बुलडाणा येथे होत असलेला बाल साहित्य लेखकांचा मेळावा म्हणजे एक ऐतिहासीक क्षण आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी केले. ते बुलडाणा येथील राष्ट्रवादी भवनमध्ये शनिवारी आयोजित राज्यस्तरीय बाल साहित्य लेखकांच्या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद् भालचंद्र जोशी हे होते. या उद्घाटन सोहळ्यामध्ये काही बालसाहित्याच्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. वाचनावर प्रकाश टाकताना राजीव तांबे म्हणाले ‘मुलं वाचनाकडे वळली पाहिजे’ असे प्रत्येकजण म्हणतात. मात्र समाजाने वाचनाकडे वळणं आज महत्वाचं आहे. अशा मेळाव्यामुळे बाल साहित्याला एक दिशा मिळत आहे. यामुळे बालसाहित्यीकारांची जबाबदारी वाढली आहे. बाल साहित्याच्या दृष्टीने तीन पातळ्यांवर विचार करायला लागणार आहे. त्यामध्ये जागतीक, देशातील आणि महाराष्ट्र अशा बाल साहित्याचा तुलनात्मक अभ्यास करून आपण कुठे आहोत हा शोध घ्यावा लागणार आहे. कुठलीही कला शासनाचे पुरस्कार मिळाले म्हणून टिकत वा वाढत नाही. तिला समाजाचे प्रोत्साहन गरजेचे असते, असे तांबे यावेळी म्हणाले. यावेळी बाल साहित्यीक जयंत मोडक, किरण केंद्रे, डॉ. विद्या सुर्वे बोरसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेक बाल साहित्यीकारांची उपस्थिती होती.
बाल साहित्य लेखकांचा मेळावा एक ऐतिहासीक क्षण! - बालसाहित्यकार राजीव तांबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 4:16 PM