- अनिल गवई
खामगाव: तालुक्यातील टेभूर्णा येथील एका कुटुंबात मुलगा जन्माला आल्यानंतरही मुलीची नोंद करून जन्म अहवाल पाठविण्याचा पराक्रम सामान्य रुग्णालय व्यवस्थापनाने केला. या अहवालाच्या आधारे नगर पालिका प्रशासनाने जन्मप्रमाणपत्र तयार केले. परिणामी, सामान्य रूग्णालय प्रशासनाच्या या ‘पराक्रमा’चा फटका संबंधीत कुटुंबातील सदस्यांना बसत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.
उप जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारादरम्यान रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडणींना तोंड द्यावे लागते. ही बाब आता नित्याचीच झाली असताना आता उपचारानंतर देखील रूग्णांच्या नातेवाईकांचा सामान्य रूग्णालय व्यवस्थापन ‘पिच्छा’ सोडत नसल्याची धक्कादायब बाब उघडकीस आली आहे. खामगाव तालुक्यातील टेंभूर्णा येथील मंगलसिंग सोळंके यांच्या पत्नी सौ. सुनिता मंगलसिंह सोळंके यांना १५ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसुतीसाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. १६ नोव्हेंबर रोजी सुनिता सोळंके यांनी मुलाला जन्म दिला. दरम्यान, उपचारानंतर १८ नोव्हेंबर रोजी सामान्य रुग्णालयातून त्यांना सुटी देण्यात आली. सोळंके यांच्या परिवारात मुलगा जन्माला आल्यानंतरही सुटीच्या दाखल्यावर मुलीच्या जन्माची नोंद करण्यात आली. इतकेच नव्हे तर यासंदर्भात जन्म अहवाल खामगाव पालिकेत पाठवितांना देखील हीच नोंद कायम ठेवण्यात आली. त्यामुळे खामगाव पालिकेने मुलीच्या जन्माची नोंद करून प्रमाणपत्र तयार केले. मुलगा जन्माला आल्यानंतरही मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र हाती आल्यानंतर आता टेंभूर्णा येथील सोळंके कुटुंबियांच्या पायाखालची वाळू सरकली असून, संबंधीत मुलाच्या शालेय प्रवेशासोबतच आधारकार्ड बनविण्यासाठीही तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सोळंके कुटुंबिय चांगलेच अडचणीत सापडले आहे. सुटीच्या दाखल्यावर चुकीची नोंद करण्यात आली असून, या दाखल्यावर वैद्यकीय अधिक्षक, सामान्य रूग्णालय खामगाव यांची स्वाक्षरी आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सामान्य रूग्णालय प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.
पालिका प्रशासनाचे कानावर हात!
मुलगा जन्माला आल्यानंतरही पालिका प्रशासनाकडून मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र देताच कसे?असा प्रश्न सोळंके कुटुंबियांच्यावतीने पालिका प्रशासनाला विचारण्यात आला. त्यावेळी सामान्य रुग्णालयाच्या जन्म अहवालानुसार ३०-१२-२०१७ रोजींच्या नोंदणीनुसार प्रमाणपत्र तयार केल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाकडून संबंधितांना देण्यात आले. सामान्य रूग्णालयातून दुरूस्ती करून आणल्यानंतर पालिकेकडून नवीन प्रमाणपत्र दिल्या जाईल. अशी बाजू पालिका प्रशासनाकडून मांडण्यात आली असून, झालेल्या गोंधळाबाबत पालिका प्रशासनाची कोणतीही चूक नसल्याचेही सष्ट करण्यात आले. दरम्यान, सामान्य रुग्णालयाकडून जन्म अहवालातील चुका ही नित्याचीच बाब असल्याचे पालिकेतील एका अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. सामान्य रूग्णालयांप्रमाणे खासगी रूग्णालयांकडूनही अशाप्रकारच्या चुका केल्या जात असल्याचीही धक्कादायक बाब समोर आली आहे. सामान्य रूग्णालयाप्रमाणेच खासगी रूग्णालयांकडूनही अशाप्रकारच्या गंभीर चुका केल्या जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
झालेल्या प्रकाराबाबत आताच काही सांगता येणार नाही. मुलाच्या जागी मुलीची नोंद करण्यात आली असल्यास, झालेला प्रकार अतिशय गंभीर आहे. कार्यालयीन दस्तवेजानुसार या प्रकाराची चौकशी करण्यात येईल. यामध्ये दोषी आढळल्यास संबंधीतांवर कारवाई प्रस्तावित केली जाईल.
- डॉ. शंकरराव वानखडे, वैद्यकीय अधिक्षक, उप जिल्हा सामान्य रूग्णालय, खामगाव.
सामान्य रूग्णालयातून आलेल्या जन्म अहवालावरून खामगाव पालिकेत प्रमाणपत्र तयार करण्यात येते. संबंधीत प्रकरणामध्ये देखील उपजिल्हा सामान्य रूग्णालयाने सादर केलेल्या अहवालावरून प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रकरणाशी पालिका प्रशासनाचा कोणताही संबंध नाही.
- राजू मुळीक, जन्म मृत्यू लिपिक, नगर परिषद, खामगाव.
सामान्य रूग्णालय प्रशासनाच्या चुकीच्या नोंदीमुळे माझ्या कुटुंबातील सदस्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुलाच्या शाळा प्रवेशासाठी तसेच आधार काढण्यासाठी प्रमाणपत्र काढले असता हा प्रकार उजेडात आला. याप्रकारामुळे आम्हाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- मंगलसिंग सोळंके, मुलाचे वडील, रा. टेंभूर्णा ता. खामगाव.