शेगाव : शेगाव विकास आराखड्यातंर्गत रस्ता कामासाठी खोदकाम केलेल्या खड्यात तार तुटून पडली. या तारेचा स्पर्श होवून एका चार वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. ही घटना गुरूवारी सकाळी ११.४५ वाजता दरम्यान घडली. या घटनेमुळे शेगावात तणाव निर्माण झाला असून मृतकाचे नातेवाईक पोलिस स्टेशनमध्ये जमा झाले आहेत.
शेगाव विकास आराखड्यातंर्गत चारमोरी पूल, माळी नगर भागात रस्ता खोदकाम सुरू आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून या ठिकाणी काम रखडले आहे. दरम्यान, मंगळवारी खोदून ठेवलेल्या खड्डयांमध्ये विद्युत तार तुटून पडली. यात विराज मोहन शेगोकार (४) या बालकाचा जागीच मृत्यू झाला. तर मोहन गोपाल शेगोकार (३५), डींगाबर शंकर डिंडोकार (४५) जखमी झाले. दोघांवरही शेगावातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे संजय पल्हाडे, रामराव घाटोळ, रामभाऊ घाटोळ, यांच्या घरातही करंट पोहोचला होता. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असून, या घटनेस जबाबदार असलेल्यांवर कारवाईसाठी मृतक विराजच्या नातेवाईकांनी गुरूवारी दुपारी पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या देत आंदोलन केले. कारवाई होईपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचा पवित्राही यावेळी उपस्थितांनी घेतला. त्यामुळे शेगावात तणाव निर्माण झाला आहे.