लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरालगतच्या साखळी येथील नंदनवन वसतीगृहामध्ये तपासणी दरम्यान आढळलेल्या अनेक अनियमितता तथा वसतीगृहातील मुलांना दिली जाणारी अयोग्य वागणूक पाहता जिल्हा बालकल्याण समितीने हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून सोमवारी या प्रकरणात प्रसंगी मोठी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.दरम्यान, शनिवारी या वसतीगृहात बाल कल्याण समिती जिल्हा बालकल्याण समिती व चाईल्ड लाईनच्या पथकाने येथे तपासणी करत १८ मुलांची सुटका केली होती. सध्या ही मुले शासकीय बालगृहात आहेत. या मुलांना पोटभर जेवण न देणे, शौचालयाच्या खड्ड्यातील माती काढावयास लावणे यासह अन्य कामे मुलांकडून येथे करून घेतल्या जात होती. सोबतच सुमार दर्जाच्या सुविधा या मुलांना दिल्या जात होत्या. त्यासंदर्भाने झालेली तक्रार पाहता ही कारवाई करण्यात आलीहोती. छत्रछाया ह्युमन डेव्हलपेमेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून नंदनवन वसतीगृह चालविण्यात येत होते. अजय दराखे हे त्याचे काम पाहतात. विशेष म्हणजे येथे नियमांचा भंग करून मुला, मुलींनाही एकत्र ठेवण्यात येत असल्याचे बाल कल्याण समितीच्या निदर्शनास आले होते.दरम्यान, यासंदर्भात बाल कल्याण समिती आता पुढे कोणती पावले उचलणार आहे याबाबत विचारणा केली असता बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा उज्वला कस्तुरे यांनी सोमवारी या प्रकरणात आणखी एक कारवाई होण्याचे संकेत दिले आहेत. मात्र नेमकी काय कारवाई होणार याबाबतचा उलगडा त्यांनी केला नाही. त्यामुळे सोमवारी याप्रकरणात मोठी कारवाई होण्याचे संकेत आहेत. विशेष म्हणजे चार विशेष म्हणजे या संस्थेला बाल अधिनियम २०१५ नुसार अनाथ मुलांना ठेवण्याची कुठलीच मान्यता नसतानाही येथे चार अनाथ मुलेही आढळून आली आहेत.(प्रतिनिधी)
साखळी वसतीगृह अनियमितता प्रकरणी बालकल्याण समिती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 2:31 PM