चिखली : गेल्या वर्षभरात कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. यात अनेक मुलांनी आपले आई-वडील गमावले आहेत. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना पाहता समाजाचा एक भाग म्हणून या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी चिखलीतील स्व. दीनदयाल वाधवाणी फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून अमित वाधवाणी सरसावले असून कोरोनामुळे आई किंवा वडील यापैकी एकजण मृत्युमुखी पडले असतील किंवा दोन्ही पालक मृत्युमुखी पडले असतील, अशा मुलांच्या इयत्ता १ ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी संस्था घेणार आहे.
कोरोनामुळे अनेक मुलांनी आपले आई-वडील गमावले आहेत. कोरोना महामारीच्या या त्सुनामीत छत्र हरवल्याने पोरक्या झालेल्या या मुलांची वैयक्तिक हानी कधीही भरून निघणारी नाही. तथापि, डोक्यावरील छत्र हरविल्याने अनेकांचे भावी जीवनदेखील अंधकारमय झालेले आहे. या स्थितीत या मुलांचे किमान शैक्षणिक नुकसान टळावे व आई किंवा वडिलांअभावी शिक्षण अर्धवट राहू नये या उदात्त भावनेने स्व. दीनदयाल वाधवाणी फाऊंडेशन या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी सरसावले आहे.
यानुषंगाने स्व. दीनदयाल वाधवाणी फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित वाधवाणी यांनी माध्यमांद्वारे माहिती दिली असून चिखली तालुक्यातील कोणत्याही गावात कोरोना काळात आई किंवा वडील गमावलेल्या मुलांची माहिती देण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. आई-वडील गमावल्याने पोरक्या झालेल्या या मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेत त्यांच्या इयत्ता १ ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारणार असल्याचे वाधवाणी यांनी स्पष्ट केले.
--नागरिकांनी माहिती द्यावी--
कोरोनामुळे उद्भवलेल्या विदारक स्थितीत अनेक समाजसेवी संस्था पुढाकार घेत विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक दायित्व पार पाडत आहेत. यामध्ये स्व. दीनदयाल वाधवाणी फाऊंडेशननेही स्तुत्य उपक्रम हाती घेत तालुक्यातील आई-वडिलांच्या निधनाने पोरक्या झालेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्या हाती घेतली आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमास हातभार लावण्यासाठी तालुक्यातील सुज्ञ नागरिकांनी अशा मुलांची माहिती ९१६८८४४७९२, ९६०४४४६८६८ किंवा ९८९०८५०१०६ या क्रमांकावर द्यावी, असे आवाहन अमित वाधवाणी यांनी केले आहे.