खामगाव : गत काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलाचा फटका मिरची पिकाला बसला आहे. मिरचीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने झाडे सुकत आहेत. त्यामुळे वानखेड भागातील शेतकरी मिरचीची झाडे उपटून काढून टाकत आहेत. हजारो रुपये खर्च करून लागवड केलेली झाडे तोडून टाकावी लागत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
जिल्ह्यात अनेक शेतकरी भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतात. वानखेड भागात अनेक शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केली आहे. पेरणीसाठी हजारो रुपचे खर्च करण्यात आले. तसेच १५ ते २० वेळा औषध फवारणी करावी लागली; पण काहीच परिणाम झाला नसून रोग कायम आहे. सध्या मिरची पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. मिरचीच्या रोपाच्या पानावर सुरकुत्या पडणे, चुरडा मुरडा होत आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. विविध प्रकारच्या रासायनिक औषधींची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने मिरचीची झाडे तोडून फेकत आहेत.
पानांवर पडल्या सुरकुत्या
बुरशीजन्य रोगामुळे मिरचीच्या रोपांची पाने वाकडीतिकडी होऊन सुरकुत्या पडल्या आहेत. शिरेकडे मुरडते व शिरे जाड होऊन पानांचा रंग फिकट हिरवा पिवळसर होऊन चुरडली आहेत.
सध्या मिरची पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे झाडे सुकत आहेत. परिणामी, काही झाडे तोडून टाकण्यात येत आहेत. बुरशीजन्य रोग नियंत्रणात येण्याकरिता कोणत्या औषधांची फवारणी करावी, याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. - दीपक हागे, मिरची उत्पादक शेतकरी, वानखेड