डोणगाव : पांगरखेड येथील पती-पत्नीचा वाद झाला. या वादातून दाेघेही पाच ते सहा महिन्याच्या चिमुकलीला गावातील एका महिलेच्या ओट्यावर ठेवून निघून गेले. दुसरीकडे बेवारस चिमुकली आढळताच गावात खळबळ उडाली. पाेलिसांनाही पाचारण करण्यात आले. पाेलिसांनी ऑपरेशन मुस्कान राबवत त्या चिमुकलीच्या आई-वडिलांचा शाेध घेतला, तसेच त्यांचे समुपदेशन करून चिमुकलीला त्यांच्या ताब्यात दिले.
आदर्श ग्राम पांगरखेड येथे २६ डिसेंबरला सकाळी गावातील एका महिलेच्या ओट्यावर ५-६ महिन्याची चिमुकली आढळली. त्यामुळे गावात खळबळ उडाली. ही बाब डोणगाव पोलीस स्टेशनला समजताच ठाणेदार दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. शिवाजी राठोड, ए. एस. आय. अशोक झोरे, पोहेकाँ. जायभाये, महिला पो. काँ. खिल्लारीचे पथक पांगरखेड येथे पोहोचले व या चिमुकलीला डोणगाव पोलीस स्टेशन येथे घेऊन आले. तिची वैद्यकीय तपासणी करून सदर आई-वडिलांची परिसरात चौकशी सुरू केली.
ठाणेदार दीपक पवार यांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत आई-वडिलांचा शाेध सुरू केला, तसेच अवघ्या तीन तासातच सदर बालिकेच्या आई-वडिलांचा शोध लावून बालिकेला त्यांच्या सुपूर्द केले. बालिकेचे आई-वडील हे पुणे येथे कामधंदा करीत होते. ते आपल्या गावी चांडस येथे आले होते व जाता-जाता पांगरखेड येथील आपल्या नातेवाइकांकडे गेले; परंतु मध्ये दोघांमध्ये तू तू-मै मै झाल्याने भांडणात मुलगी त्यांनी नातेवाइकांच्या ओट्यावर ठेवली व निघून गेले; परंतु राग शांत झाल्यावर ते मुलीला आणायला पांगरखेड येथे निघाले तेव्हा त्यांना मुलगी डोणगाव पोलीस स्टेशन येथे असल्याचे समजले. पोलीस आई-वडिलांचा शोध घेत असल्याचे समजताच त्यांनी डोणगाव पोलीस स्टेशन गाठून चुकीची माफी मागून बाळ परत करण्याची मागणी केली. यावेळी ठाणेदार पवार यांनी त्यांचे समुपदेशन करून बालिकेला आई-वडिलांकडे साेपविले.