शाळेत प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षण प्रभावी असल्याने दुसऱ्या वर्गापासूनच मुलांना उजळणी मुखोद्गत होऊ लागली; परंतु आता शाळेपासून दुरावलेल्या मुलांना जोडशब्दांचे वाचन करणे कठीण जाऊ लागले आहे. इयत्ता पाचवीच्या मुलांना भागाकार व गुणाकार कसा करायचा, याचा विसर पडला आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात शाळेकडून पाठ्यपुस्तकांचे वाटप झाले; परंतु कोणत्याही विषयाच्या पुस्तकाचे पान उघडून न पाहणाऱ्या मुलांना यंदा कोणते धडे अभ्यासासाठी आहेत, हेसुद्धा माहीत नाही.
पालकांनी घरातच घ्यावी शाळा...
कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइनचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे पालकांनी पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
विद्यार्थ्यांची अक्षर ओळख होण्यासाठी पालकांनी पाल्यांकडून नियमित काही पाने शुद्धलेखनाचा सराव करून घेणे आवश्यक आहे.
केवळ ऑनलाइनच्या भरवशावर न राहता स्वत: पाल्यांच्या दैनंदिन अभ्यासाकडे लक्ष द्यावे, घरातच काळजी घेऊन मूल्यांकन करणेही गरजेचे आहे.
मुलांना अक्षरओळख होईना!
दीड वर्षापासून केवळ मोबाइलचा उपयोग करून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. लिहिण्याची सवय नसल्याने विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडत आहे.
लिहिण्याची गती मंदावली असून, अक्षरओळखही कठीण झाली आहे. पालकवर्गही लक्ष द्यायला तयार नाही.
पहिली - दुसरीच्या विद्यार्थ्यांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ऑनलाइन शिक्षणाचा फारसा परिणाम दिसत नाही.
अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक
कोरोना काळात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. मोबाइल आणि टीव्हीच्या सभोवताल त्यांचा दिवस राहतो.
ऑनलाइन शिक्षणात फारसा रस नसल्याने अनेकांचे मन एकाग्र राहत नाही. यामुळे अभ्यास करण्याची इच्छा नसते.
यामुळे चिमुकले अभ्यास टाळण्यासाठी विविध कारणे सांगत आहेत. त्यामुळे पालकांची डोकेदुखी वाढली आहे.
वारंवार सांगूनही अनेकांचे पाल्य ऐकत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याचे विविध परिणामही समोर येत आहेत.
चिमुकल्यांना दैनंदिन अभ्यासाचा विसर पडत चालला आहे. पालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
पालकांची अडचण वेगळीच
शाळेमध्ये गेल्यानंतर दिवसभर मुले व्यस्त राहत होती. त्यानंतर घरी अभ्यास व नंतर शिकवणी वर्गात जात होते. मात्र, आता ऑनलाइन शिक्षणामुळे त्यांच्याच हाती मोबाइल असतो. क्लासनंतर मोबाइलमध्ये गेम, कार्टून पाहणे यात जास्त वेळ जात आहे.
- संजय केशवराव देशमुख.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे हसत - खेळत होणारे शिक्षण बंद झाले. ऑनलाइनमुळे अडचणी वाढल्या आहेत. केवळ मोबाइलच्या भोवती शिक्षण सुरू आहे. त्यामुळे अभ्यासातही मन लागत नसल्याचे दिसून येत आहे.
- भगवान मनोहर कंकाळ.