यावेळी बोलताना भाई अशांत वानखेडे म्हणाले की, गावातील दोन्ही समाजांना विश्वासात घेऊन जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने येथे समता, बंधुभाव प्रस्थापित केला पाहिजे. कोम्बिंग ऑपरेशन राबवून खोटे गुन्हे दाखल करीत येथील वातावरण चिघळवू नये. हे कोम्बिंग ऑपरेशन थांबविण्यात यावे, येथील घटनेत ज्यांनी गुन्हा केला असेल, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. मात्र, चुकीच्या पद्धतीने ते दाखल होऊ नयेत. दुसरीकडे बुलडाण्याचे आ. संजय गायकवाड यांनी केलेल्या एका कथितस्तरावरील विधानात मातोश्रीचा उल्लेख केला आहे. त्यामुळे चितोडा प्रकरणामध्ये मुख्यमंत्री तथा गृहराज्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असेही भाई अशांत वानखेडे यावेळी म्हणाले.
--पोलिसांनी वस्तुस्थिती बघून कारवाई करावी--
या घटनेत पोलिसांनी वस्तुस्थिती पाहून कारवाई करावी. खोटी कारवाई केल्यास आम्हाला प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागले, असे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करण्यात आले. रस्ते अपघात झाल्यानंतर एखादा जखमी अथवा मृत व्यक्ती बघून उपस्थित जमाव सबंधितास मारहाण करतो. अशाच पद्धतीने क्रियेची प्रतिक्रिया चितोडा येथे झाली. त्यास जातीयवादाचे स्वरुप लोकप्रतिनिधींकडून देण्याचा प्रयत्न झाल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.