लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात सिंचन सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने बळीराजा संजीवनी योजनेतंर्गत येत असलेल्या आलेवाडी, अरकचेरी आणि चौंढी प्रकल्पाची कामे भूसंपदानाच्या प्रक्रियेतील अडथळ्यामुळे रखडली आहेत. संयुक्त मोजणीनंतरही काही शेतकऱ्यांनी जादा मोबदल्याची मागणी केली आहे. त्याचाही फटका ही प्रकल्पाच्या पुर्णत्वास बसत आहे .सुमारे ६७३ कोटी १६ लाख रुपये खर्च या तीनही प्रकल्पांसाठी अपेक्षीत असून यापैकी काही निधी अद्याप अप्राप्त आहे. तीनही लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांद्वारे सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात एकूण क्षमतेच्या जवळपास ६८ हजार हेक्टरवर होणाऱ्या सिंचनामध्ये वाढ होऊन ते ७० हजार हेक्टरवर पोहोचेल. मात्र चौंढी प्रकल्पाच्या घळभरणीच्या प्रक्रियेमध्ये मात्र अडचण येण्याची शक्यता आहे. मालकी हक्कासंदर्भातील काही प्रकरणांमध्ये समस्या आहेत. दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी संयुक्त मोजणीनंतर फळझाडांची लागवड केलेली आहे. त्यांची मागणी वाढीव मोबदल्याची आहे. त्यामुळेही भूसंपादनाच्या प्रक्रियेत अडचणी येत आहे. तिन्ही प्रकल्पांचे भूसंपादनाचे काम जवळपास पूर्णत्वास आलले आहे. मात्र मोजक्या काही अडचणीमुळे त्यात समस्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर भूसंपादनाची प्रकरणे त्वरेने मार्गी लागल्यास २०२३ अखेर या प्रकल्पाद्वारे प्रत्यक्ष सिंचनाचे लाभ मिळण्यास प्रारंभ होईल, असे संकेत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर या कामांना प्राधान्य देण्याची गरज आहे.गेल्या आठ दिवसापूर्वी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत या प्रकल्पांच्या पुर्णत्वासाठी येत असलेल्या अडचणीचाही आढावा घेण्यात आला आहे.
चौंढी, आलेवाडी, अरकचेरीची प्रकल्पांची कामे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 11:13 IST