जानेफळ परिसरात वाढल्या चोरीच्या घटना
जानेफळ : परिसरात चोरीच्या घटना वाढल्या असून, चोरट्यांचा शोध लागत नसल्याने चोरट्यांना अभय मिळत आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीसच येथील मुख्य रस्त्यावर असलेली दुकानेच फाेडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे, या भागात पाेलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी हाेत आहे. तसेच चाेरट्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामपंचायतीमध्ये शासन निर्णयाला खो
बुलडाणा : अनेक ग्रामपंचायतमध्ये प्रत्यक्षात महिलांचे पतीच सरपंचपदाचा कारभार करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, महिला सरपंचांचे पती कारभार करीत असल्यास कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. परंतु ग्रामपंचायतींमध्ये शासन निर्णयाला खो बसत आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये पती आपली राजकीय वाटचाल कायम ठेवण्यासाठी पत्नीला नामधारी सरपंचपदावर बसवितात. बैठका असो किंवा ग्रामसभा, येथे पती स्वत: उपस्थित राहून निर्देश देतात.
ब्रिटिशकालीन इमारतींमध्ये कारभार
बुलडाणा : जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांचा कारभार आजही ब्रिटिशकालीन इमारतींमध्ये सुरू आहे. बुलडाणा येथील पाटबंधारे विभागाचे कार्यालयही अत्यंत जुनाट इमारतीमध्ये थाटलेले आहे. त्यामुळे ह्या इमारतींना धोका निर्माण होत आहे.