- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : दुसरी लाट ओसरल्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. तेव्हापासून नागरिकांनी मास्क वापरणे कमी केले आहे. आता कोरोना संपला, असेच त्यांना वाटत आहे. सध्याच्या स्थितीत शहरात कुठल्याही भागात गेले तरी, दहापैकी सात लोक विनामास्कचे पाहायला मिळतात. ‘लोकमत’ने याबाबतचे वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, हा धक्कादायक प्रकार शहरात सर्वत्र पाहायला मिळाला. कोरोना विषाणू संसर्ग आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी शासनस्तरावरून विविध उपाययोजना करण्यात आल्या. लॉकडाऊन, कडक निर्बंध लावण्यात आले. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली. दरम्यान, आता कोरोनाचे संकट काही प्रमाणात टळले असले तरी, तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याची भीती व्यक्त होत आहे. अद्याप काही जणांना कोरोना संसर्गाचा फटका बसत असताना, नागरिकांच्या बेफिकीर वृत्तीत वाढच होत आहे. बाजारपेठ, बँका आणि इतर सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असतानाच मास्क आणि सॅनिटायझरचा वापरही अनेकांकडून टाळला जात असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे.पोलिसांचाही मास्क तोंडाखाली!n काही ठिकाणी कारवाई करणारे पोलीस विनामास्क पाहायला मिळत आहेत. स्वत:लाच मास्क नसल्याने इतरांवर कारवाई करताना ते हात आखडता घेत असल्याचे दिसते. काही मोजके कर्मचारी वगळता इतरांकडून मास्कचा वापर होताना दिसत नाही.
कोरोना महामारीत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. पूर्वीच्या तुलनेत कारवाईचे प्रमाण कमी आहे. मात्र, कारवाई नाहीच असे नाही. नियम न पाळणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कारवाईसाठी प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. - मनोहर अकोटकर, मुख्याधिकारी, नगरपरिषद, खामगाव.
विनामास्क तसेच वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठीही शहर पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचे संकट पूर्णत: टळले नसल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.- सुनील अंबुलकर, शहर पोलीस निरीक्षक, खामगाव.