संदीप वानखडे
बुलडाणा : काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. कधी लसींचा तुटवडा असताना लसीकरण केंद्रांवर रांगा लागत हाेत्या. सध्या काेराेना रुग्ण कमी झाल्याने लसीकरण केंद्र ओस पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे, लसीकरणासाठी गावाेगावी विशेष शिबिरे घेण्याची तसेच आणखी जनजागृती करण्याची गरज आहे.
काेराेनाची दुसरी लाट ग्रामीण भागापर्यंत पाेहोचली. पहिल्या लाटेच्या तुलनेत ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहरातही अनेक पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नागरिकांना लसीचे महत्त्व पटले हाेते. त्यामुळे नागरिक लसीकरणासाठी माेठी गर्दी करीत हाेते. जुलै महिन्यात काेराेना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर नागरिक निर्धास्त झाले आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धाेका पाहता आराेग्य विभागाने लसीकरणासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात अजूनही अनेक जण लस घेण्यासाठी येत नसल्याचे चित्र आहे. शहरातही हीच स्थिती आहे. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरण केंद्रावर पहिला डाेस घेण्यासाठी माेजकेच नागरिक येतात. ग्रामीण भागात पहिला डाेस घेऊन दुसरा डाेस घेण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नागरिक येत आहेत. या केंद्रावर माेजकेच लाेक लसीकरणासाठी येत आहेत.
गैरसमज दूर करण्याची गरज
काेराेनाच्या लसींविषयी लाेकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. काही दिवसांपूर्वी एका नाेबेल विजेत्या शास्त्रज्ञानाच्या नावाने समाजमाध्यमावर एक पाेस्ट व्हायरल केली हाेती. त्यामध्ये लस घेतलेल्या लाेकांचा मृत्यू हाेणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आली हाेती. ही बाब अजूनही अनेक नागरिकांच्या मनात असल्याने लस घेण्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. आराेग्य विभागाने लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतरही लाेक लस घेण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
व्यापक माेहीम राबवण्याची गरज
बुलडाणा जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, जिल्ह्याला लागून असलेल्या अकाेल्यात डेल्टाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे धाेका वाढला आहे. तिसऱ्या लाटेचा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. त्यामुळे लसीकरण करण्यासाठी व्यापक माेहीम राबवण्याची गरज आहे. ग्रामीण भागासह शहरातील वाॅर्डनिहाय अशी माेहीम राबवण्याची गरज आहे.
प्रतिक्रिया
काेराेना लस पूर्णपणे सुरक्षित आहे. तिसऱ्या लाटेचा धाेका पाहता सर्व नागरिकांनी प्राधान्याने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. तसेच काेराेनाविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नागिरकांनी काेणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे.
डाॅ. नितीन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा