लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तब्बल २२ दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत असल्याने, शहरातील भाटीया ले-आऊट आणि अयोध्या नगरातील नागरिकांनी शुक्रवारी पालिकेत धडक दिली. यावेळी पाणी पुरवठा विभागात ठिय्या देत, पाणी पुरवठा अभियंता, पर्यवेक्षक यांना नागरिकांना घेरावही घातला.
शहरातील भाटीया ले-आऊट आणि अयोध्या नगर भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी भेडसावत आहे. याबाबत पालिकेकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही संबंधितांकडून कोणतीही दखल घेण्यात येत नाही. गेल्या २२ दिवसांपासून परिसरात पाणी पुरवठा करण्यात आला नाही. गुरूवारी अनेक ठिकाणी पाणी मिळाले नाही. त्यामुळे संतत्प झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी दुपारी पालिकेत एका मोर्चाद्वारे धडक दिली. तात्काळ पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. यावेळी काही जण संतप्त झाल्याने, काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, पाणी पुरवठा अभियंता प्राजक्ता पांडे यांनी नागरिकांची समजूत काढली. त्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी पर्यवेक्षक सुरेशसिंह ठाकूर, पवन गरड, नगरसेवक गणेश सोनोने आदींची उपस्थिती होती.
या आंदोलनात विजय राठोड, गजानन मिरगे, डिंगाबर भोंडेकर, विलास राऊत, कमल पवार, संजय बोंबटकर, आर.पी. जाधव, भूषण पवार, विजय इंगळे, संजय गिरजापूरे, रत्ना बयस, मधुकर बोराडे, अनिल राठी, दीपक देशमुख यांच्यासह परिसरातील महिला मोठ्यासंख्येने सहभागी झाल्या होत्या.