लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: संपूर्ण मानव जातीचे कल्याण हाच सर्व धर्मग्रंथांचा सार असून प्रभु रामासह महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शांततेचा संदेश दिला आहे. त्यामुळे त्यांचा जन्मोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी पोलिस प्रशासनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांनी येथे केले.
स्थानिक शहर पोलिस स्टेशनमध्ये आयोजित शांतता समितीच्या सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. रामनवमी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि निवडणुकीच्या अनुषंगाने गुरूवारी रात्री ८ वाजता ही सभा पार पडली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उप विभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष ताले, नगर परिषद उपाध्यक्ष संजयमुन्ना पुरवार, शरद वसतकार यांची उपस्थिती होती.
यावेळी महापुरूषांच्या जयंती उत्सव मिरवणुकीसंदर्भात उपस्थित मंडळांच्या पदाधिकाºयांशी चर्चा करण्यात आली. त्यांच्या समस्या जाणून घेत, शंकांचे निरसन करण्यात आले. आभार संतोष ताले यांनी मानले. यावेळी नगरसेवक विजय वानखडे, गणेश सोनोने, राजेश हेलोडे, गौतम नाईक, विष्णु गवई, रवी मोरे, मो.नईम आदींची उपस्थिती होती.
पोलिस प्रशासनाचे सर्वोतोपरी सहकार्य!
आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये खामगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे. शांततेच्या मार्गाने महापुरूषांची जयंती साजरी करणाºयांना पोलिस प्रशासनाच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उप विभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी यावेळी दिली.