बुलडाणा : वेगवेगळ्या कामांसाठी आधार दुरुस्तीची गरज असताना बुलडाणा शहरात माेजकेच केंद्र आहेत. त्यामुळे, नागरिकांची भटकंती हाेत आहे. काही केंद्र बंद राहत असल्याने सुरू असलेल्या केंद्रावरच माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध याेजनांच्या लाभासह विविध कामांसाठी आधार आवश्यक करण्यात आला आहे. आधारवरच बरीच कामे हाेत असल्याने ते अद्ययावत करावे लागते. बॅंक खात्याला जाेडण्यासाठी, तसेच माेबाईल क्रमांक अपडेट करण्यासाठी, पत्ता बदलण्यासाठी व नवीन आधार काढण्यासाठी बुलडाणा शहरात माेजकेचे केंद्र सरू आहेत. त्यातही जिल्हाधिकारी कार्यालयात असलेले केंद्र बंदच राहत असल्याने नागरिकांची भटकंती हाेत आहे. बॅंकांमध्ये आधार नाेंदणी केंद्र सुरू केले असले तरी त्यामध्ये रांगा लागत आहेत. सकाळी अर्ज दिल्यानंतर दुपारी आधार दुरुस्तीसाठी बाेलावण्यात येते. काही केद्रावर तर आठ दिवसांनीच बाेलावण्यात येत असल्याचे चित्र आहे. बुलडाणा शहरात जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात व सागवन ग्रामपंचायतमध्ये दाेन केंद्र दिलेले आहेत. केंद्र कमी असल्याने नागरिकांना सकाळीच रांगा लावाव्या लागत आहेत.
यासाठी करावे लागते आधार नुतनीकरण
आधार कार्डवर जन्मतारीख पूर्ण टाकणे, माेबाईल क्रमांक जाेडण्यासाठी, पत्ता बदलण्यासाठी, नाव बदलण्यासाठी, ई-मेल टाकण्यासाठी,चुकीची दुरुस्ती करण्यासाठी आधार नुतनीकरण करावे लागते.
आधार कार्ड दुरुस्तीसाठी केंद्र कुठे सुरू आहेत याविषयी माहिती मिळत नाही. आधार दुरुस्ती केंद्रावर गेल्यानंतर आधी अर्ज देण्यात येताे. अर्ज घेण्यासाठी सकाळपासून रांगेत रहावे लागते. त्यानंतर अर्ज मिळताे. आधार दुरुस्तीसाठी दुपारी बाेलवण्यात येते. संपूर्ण दिवस आधार दुरुस्तीसाठी जाताे.
वैष्णवी जाधव, बुलडाणा
आधार कार्ड दुरुस्तीसाठी सकाळपासून रांगेत लागावे लागते. सकाळी ११ वाजताची वेळ असली तरी आधार दुरुस्ती करणारा कर्मचारी विलंबाने येताे. त्यामुळे, एक तास रांगेत रहावे लागते. त्यानंतर नंबर आल्यानंतरही केवळ अर्ज दिला जाताे. दुपारी वेळ देऊन दुरुस्तीसाठी बाेलावण्यात येते.
अमाेल क्षीरसागर, बुलडाणा