भूषण मनोहर कराळे (रा. डिडोळा खुर्द) याचे यांची मोताळा येथे विघ्नहर्ता ट्रेडर्स पानमसाला व किराणा दुकान आहे. बाजूला शिंबरे ट्रेडर्स ही खते व बियाण्यांची दुकान आहे. शनिवारी रात्री या दुकानात चोरट्याने प्रवेश केला. तेथे त्याला काही मिळाले नाही. त्यामुळे चोरट्याने विघ्नहर्ता ट्रेसकडे मोर्चा वळवला. तेथून तंबाखू, बिड्या आणि रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. यात ४० ते ४५ हजार रुपयांचा माल चोरी गेल्याचा अंदाज भूषण कराळे यांनी व्यक्त केला. चोरटा शिंबरे ट्रेडर्सच्या सीसी कॅमेऱ्यात कैद झाला असून, रात्री साडेनऊ ते पाऊण वाजेपर्यंत हा चोरटा दुकानातच होता. भूषण कराळे रविवारी दुकान बंद ठेवतात. मात्र शेजारील शिंबरे ट्रेडर्सच्या संचालकांना सदर प्रकार लक्षात येताच त्यांनी कराळे यांना माहिती दिली. कराळे यांनी पाहणी केली व पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे. अद्याप या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.
मागील काही दिवसांपासून मोताळा शहरासह परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. येथील मोबाईल शॉपमध्ये पाच लाखांची चोरी झाली होती. तर, मागील आठवड्यात किराणा दुकान फोडून एक लाखांचा ऐवज चोरी गेला. मात्र पोलिसांना अद्यापही चोरट्याचा बंदोबस्त करता आलेला नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाविषयी रोष व्यक्त होत आहे.
--पशुधनही चोरट्यांच्या रडारवर--
मोताळ्यातील पशुधनही चोरट्यांच्या रडारवर आहे. राजाराम घडेकर यांच्या गोठ्यातील चार जर्सी गायी एक गावरान गाय, तीन वासऱ्या व एक बैल बांधलेला असताना चोरट्याने गोठ्यातील २० हजार रुपये देशी गाय चोरून नेली. शनिवारी ही घटना उघडकीस आली. प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.