खामगाव (बुलढाणा) : शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये सशस्त्र हाणामारी झाली. यात दोनजण जागीच ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले. शनिवारी दुपारी ही घटना खामगाव तालुक्यातील चिंचपूर येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलिस घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, चिंचपूर गावाच्या शिवारातील एका शेतात शनिवारी दुपारी साडेबारा वाजता पेरणी सुरू होती. ही पेरणी सुरू असतानाच दुसऱ्या गटाने पेरणीला मनाई करीत वाद घातला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यानंतर दुसऱ्या गटाने लोखंडी टॉमी आणि शस्त्राचा वापर केला. यात गंभीर दुखापत झाल्याने शे. कासम शे. जान मोहमद (वय ३४), मोहमद खान तुराबखान (वय ३५) हे दोघे जागीच गतप्राण झाले. या घटनेची माहिती मिळताच, हिवरखेड पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.
जखमींवर खासगी रुग्णालयात उपचारया घटनेत शकिलाबी अल्यार खान (वय ४०), शरिफाबी तुराबखान (वय ५०) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खामगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पेरणी करताना झाला हल्लाशेतात पेरणी सुरू असताना हल्ला करण्यात आला. एका बेसावधक्षणी हल्ला झाल्याने शे. कासम शे. जान मोहमद, मोहमद खान तुराबखान ठार झाले. मृत्युमुखी पडलेल्या दोघांचे पार्थिव खामगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. याप्रकरणी पुढील कारवाई हिवरखेड पोलिस करीत आहेत.