खामगाव: स्वच्छ सर्वेक्षणात खामगाव नगर पालिकेने अमरावती विभागात प्रथम पारितोषिक पटकाविले असून पालिकेला ७ कोटी रुपयांचा पुरस्कार गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आॅनलाइन वितरीत करण्यात आला. त्यामुळे खामगाव पालिकेचे स्वच्छतेचे प्रयत्न फळास आले आहेत.खामगाव शहराला क्लिनसिटी बनविण्यासाठी नगर पालिका प्रशासनाकडून सातत्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. घंटागाडीद्वारे सकाळ-संध्याकाळ कचरा संकलन करणारी खामगाव ही जिल्ह्यातील पहिलीच नगरपालिका आहे. तसेच नियमित साफसफाई, स्वच्छतागृहांची निर्मिती यासह सातत्याने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येतात. परिणामी, केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खामगाव पालिकेने नावलौकीक मिळवित अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत कराड नगर पालिका राज्यात प्रथम आली असून खामगाव पालिकेने या यादीत १७ स्थान पटकाविले आहे. गत वर्षी या स्पर्धेत खामगाव पालिका १८१ व्या क्रमांकावर होती. मात्र, यावेळी खामगाव पालिकेने राज्यातील आघाडीच्या २० नगर पालिकांच्या यादीत येण्याचा मान मिळविला आहे. राज्यात प्रथम असलेल्या कराड पालिकेचा स्वच्छतागुणांक ५३६६.०५ असून खामगावचा स्वच्छतागुणांक ३८९८.६७ आहे. तर शेगाव पालिकेचा ३८३९,५४ इतका आहे. मोठी लोकसंख्या, विस्तीर्ण क्षेत्रफळ व बाजारपेठेचे शहर असताना खामगाव पालिकेला स्वच्छता अभियानात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत विभागात बाजी मारली आहे.
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर पालिका प्रशासनाकडून सातत्यपूर्ण प्रयत्न केले जातात. पुरस्कारामुळे नगर पालिकेचे प्रयत्न फळास आले आहेत.-अनिताताई डवरेनगराध्यक्ष, खामगाव.
खामगाव शहरात स्वच्छता राखण्यासाठी सुरूवातीपासून भर दिला. स्वच्छ भारत अभियानातही पालिकेची जिल्ह्यात आघाडी आहे. त्यामुळेच पालिकेने अमरावती विभागात पहिले स्थान पटकाविले आहे.- धनंजय बोरीकरमुख्याधिकारी, खामगाव.