अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: खामगाव नगरपालिकेने स्वच्छ अँप डाउनलोडिंगचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेद्वारे होत असलेल्या जाणीव जागृतीचे सकारात्मक परिणाम खामगावकरांवर झाल्याचे दिसून येते. अवघ्या महिनाभरात पालिकेने उद्दिष्ट साध्य केल्याने, स्वच्छ सर्वेक्षणात पालिकेच्या सरशीचा मार्ग मोकळा झाल्याचे संकेत आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या धरतीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राज्यातील विविध शहरांमध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या सहभागामुळे या सर्वेक्षण महत्त्वाचे मानले जात असतानाच, नागरिकांचा ‘फिडबॅक’ हा या सर्वेक्षणाचा महत्त्वपूर्ण घटक बनला असून, पालिका प्रशासनाकडून नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादासाठी प्रयत्न केले जात आहेत. विविध उपाययोजनाही पालिका प्रशासनाकडून केल्या जाताहेत. यामध्ये स्वच्छता अँप डाउनलोडिंग सोबतच जनजागृतीचाही समावेश असून, भावनात्मक प्रतिसादासाठी ‘स्वच्छता भूत’ अधोरेखित करण्यात आले. या जाणीव जागृतीचा सकारात्मक परिणाम खामगावकरांवर झाला असून, स्वच्छता अँप डाउनलोडिंगमध्ये पालिकेने अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण केले आहे. निर्धारित उद्दिष्टापेक्षाही अधिक उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिकेची वाटचाल सुरू आहे.
तात्काळ तक्रारीसाठी ‘अँप’ची सुविधा!शहर स्वच्छतेसाठी नगरपालिका प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छता कशी करात येईल, याबाबत प्रयत्न केले जात आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २0१८ मध्ये देशातील शहरांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये खामगाव शहर ४१५ व्या स्थानी असून, शहर स्वच्छतेसाठी पालिका प्रशासनासोबतच पालिका पदाधिकार्यांनी पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छता अँप’ सुरू करण्यात आले आहे. या अँपद्वारे आपल्या परिसरातील तक्रारी पालिकेपर्यंत पोहचविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
निर्धारित उद्दिष्ट पूर्ण!खामगाव शहरासाठी सुरुवातीला अँप डाउनलोडिंगसाठी १,८३६ उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात १६ फेब्रुवारीपर्यंत १,८९0 जणांनी मोबाइल अँप डाउनलोड केले आहे. यामध्ये १,८७८ अँड्रॉइड मोबाइलधारक असून, १२ जणांकडे (आयओएस) सिस्टीम मोबाइलधारक आहेत. अद्यापपर्यंत एकाही सिटी अँपधारकाने स्वच्छता अँप डाउनलोड केले नसल्याचे दिसून येते.