लोकमत न्यूज नेटवर्कबिबी : बुलडाणा येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.जे.आर. मकानदार हे १२ जुलै रोजी दौऱ्यावर असताना त्यांनी बिबी येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात पाच सफाई कामगार असूनही स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार समोर आला. यावेळी कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.बिबी येथील ग्रामीण रुग्णालयाला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.जे.आर.मकानदार यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या. रुग्णालयातील कॉटवर नवीन गाद्या, बेडशिट का टाकल्या नाहीत, याची वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारणा केली, तसेच आॅक्सिजन मशीन सुरू आहे का? किती कर्मचारी संख्या आहे, किती कर्मचारी हजर आहेत, तसेच सहायक डॉक्टर यांना वैयक्तिक ओपीडी ठेवत नाहीत का? अशी विचारणा केली असता, त्यांच्याकडे ओपीडी अहवाल आढळून आला नाही. यावेळी एचआयव्ही लॅब कर्मचारी व डेन्टीस्ट डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले आणि दुसऱ्या भेटी दरम्यान सर्व समस्यांचा निपटारा करा, अशा सूचना केल्या. स्वच्छता कामगार संख्या ५ असून संपूर्ण हॉस्पिटल अस्वच्छ दिसून आले. यावेळी पिण्याच्या पाण्याची समस्या आढळून आली. दरम्यान, डॉ.मकानदार यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सुधारणा करण्याचे सुचविले. त्यावर वै.अ.डॉ.भटकर यांनी आठवड्यात सर्व सुधारणा पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
ग्रामीण रुग्णालयात सफाई कामगार असूनही अस्वच्छता!
By admin | Published: July 14, 2017 11:48 PM