कांँग्रेस आक्रमकलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कधीकाळी काँग्रेसचा गड असलेला जिल्हा भाजपने बळकावला आहे. मोदी लाटेनंतर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात गेल्यामुळे काँग्रेसचे अस्तित्व हरविले आहे; मात्र गड पुन्हा काबिज करण्याकरिता काँग्रेस आक्रमक झाली असून, प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात अन्य पक्षांच्या तुलनेत काँग्रेसची पाळेमुळे गावागावापर्यंत रूजली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व प्रत्येक गावात काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्या तुलनेत जिल्ह्यात अन्य कोणत्याही पक्षाचे संपूर्ण जिल्ह्यात कार्यकर्ते नाहीत. केंद्र, राज्य, जिल्हा परिषद व नगर पालिकांमध्ये सत्ता गेल्यानंतर काँग्रेस बँकफूटवर जाईल, असा अंदाज होता; मात्र त्याऐवजी अधिक आक्रमक होत पुन्हा उभारणी करण्याकरिता काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांच्यावतीने प्रयत्न सुरू करण्यात आले. गटातटात काँग्रेस विभागली असली, तरी आता परिस्थिती व हवा आपल्या विरोधात असल्याचे लक्षात येताच आंदोलनाच्यावेळी काँग्रेसजन एकत्र आले.घाटाखाली आणि घाटावर अशा दोन भागात जिल्हा विभागल्या गेला आहे. घाटाखाली भाजपचे वर्चस्व आहे, तर घाटावर काँग्रेसचे आहे. घाटाखाली सध्या कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, आ. चैनसुख संचेती, आ. संजय कुटे आ. आकाश फुंडकर असे एक मंत्री तीन आमदार आहेत, तर घाटावर आ. हर्षवर्धन सपकाळ व आ. राहुल बोंदे्रे हे काँग्रेसचे दोन आमदार आहेत. मलकापूर मतदार संघाचे गत २५ वर्षांपासून चैनसुख संचेती आमदार आहेत, तर जळगाव जामोदमध्ये तिसऱ्यांदा डॉ. संजय कुटे विजयी झाले आहेत. खामगावमध्ये कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे वर्चस्व आहे. घाटाखाली भाजप प्रबळ असली तरी काँग्रेसचेही अस्तित्व कायम आहे. घाटावर भाजपचे बळ कमी आहे. काही तालुक्यांमध्ये भाजप नावालाही नाही. मोताळा तालुक्यात भाजपचा एकही जिल्हा परिषद सदस्य विजयी झाला नाही. तसेच सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ आहे; मात्र घाटाखालील खामगाव व जळगाव जामोद तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीचे संख्याबळ अत्यल्प आहे. जिल्ह्यात गत काही वर्षांमध्ये काँग्रेसमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांच्या जागी आ. राहुल बोंद्रे यांची नियुक्ती झाली. त्यांच्या नेतृत्वातच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढल्या गेल्या. या निवडणुकांमध्ये भाजपचे संख्याबळ वाढले असले, तरी त्यांमध्ये काँग्रेस पक्षातून गेलेल्यांचीच संख्या अधिक आहे. हवा पाहून दिवा लावणाऱ्यांनी काँग्रेस सोडून भाजप गाठली व सत्तेत सहभागी झाले. मोदी लाट व भाजपसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे काँग्रेसची सत्ता गेली. बुलडाणा जि.प.च्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेस विरोधी पक्षात बसली. त्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा, नोटाबंदीच्या वेळी आयोजित विविध कार्यक्रमांसह तुरीचे आंदोलन करण्यात आले. तुरीच्या आंदोलनामध्ये आ. राहुल बोंद्रे यांच्यासह १९ पदाधिकारी उपोषणास बसले. यादरम्यान जिल्हाभर झालेल्या आंदोलनांमुळे जिल्हा ढवळून निघाला. तसेच त्यानंतर आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी तुरीच्या मुद्यावरूच जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना उचलून जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष उभे केले व तूर उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तुरीची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याकरिता आंदोलन करण्यात आले. तर बुधवारी पुन्हा प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत एल्गार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर राज्यभर आंदोलन पुकारण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पूर्ण काँग्रेसी एकत्र येणार आहेत. जाणाऱ्यांसोबतच येणाऱ्यांचीही गर्दी काँग्रेस सत्तेतून बाहेर गेल्यामुळे पक्ष सोडून काही जण गेले तसेच काहींनी पक्षात प्रवेशही केला. माजी आमदार धृपदराव सावळे, योगेंद्रे गोडे, शिवचंद्र तायडे यांनी पक्ष सोडला तर माजी मंत्री सुबोध सावजी, शैलेश सावजी यांनी पुन्हा पक्षात प्रवेश केला. तसेच बुलडाण्यात शिवसेनेचे नगरसेवक दत्ता काकस यांनीही प्रवेश घेतला.
गमाविलेला गड काबीज करण्यासाठी पराकाष्ठा!
By admin | Published: July 12, 2017 1:03 AM