लोकमत न्यूज नेटवर्कमाटरगाव : येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. सदर मागणीस सरपंच, ग्रा.पं. सदस्यांसह ७३५ ग्रामस्थांनी पाठिंबा देऊन ठराव पारित करण्यात आला. सदर ठरावावर सह्यासुद्धा झाल्या आहेत.माटरगाव येथे शासनमान्य देशी दारूचे दुकान असून, सदर दुकानाच्या २00 फूट अंतरावरच जि.प.ची उर्दू शाळा आहे. त्यामुळे शाळेमध्ये शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांवर याचा विपरी त परिणाम होत आहे. तसेच बाजूलाच मरी मातेचे मंदिर असून, ते थे दररोज सकाळ व संध्याकाळी भाविक भक्त दर्शनासाठी जातात. त्यामुळे भाविक भक्तांना दारुड्यांचा त्रास सहन करावा लागतो. देशी दारूच्या दुकानासमोर धर्मशाळा असून, सदर धर्मशाळेतसुद्धा नेहमीच धार्मिक कार्यक्रम, लग्नसमारंभ इत्यादी कार्यक्रम होत असतात. त्यामुळे महिलांनासुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो. सदर दारू दुकानासमोर लोक नेहमी दारू पिऊन धिंगाणासुद्धा घालतात. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणार्या लोकांनासुद्धा त्रास होतो. तसेच दारूच्या या सवयीमुळे गावातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. गावामध्ये दारूमुळे नेहमी वाद होऊन बिकट परिस्थितीही निर्माण होत आहे. त्यामुळे येथील सरकारमान्य देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे, अशी मागणी ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली आहे. सदर मागणी महिला व पुरुषांच्यावतीने करण्यात आली. त्याला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी सकारा त्मक प्रतिसाद दिला व गावातून दारू ही कायमची हद्दपार व्हावी व गावातील सर्व जनता ही सुखी समाधानाने नांदावी म्हणून याबाब तचा ठराव हा एकमताने मंजूर झाला आहे. सदर ठरावावर सूचक राजेंद्र आळशी असून, अनुमोदन प्रकाश तायडे यांनी केले.सदर ठरावाच्या प्रती गृहराज्यमंत्री ना. रणजित पाटील, पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर, आमदार अँड. आकाश फुंडकर, मुंबई पोलीस महासंचालक सतीश माथूर, जिल्हाधिकारी बुलडाणा, विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलडाणा, ठाणेदार जलंब आदींनासुद्धा पाठविलेल्या आहेत.
युवकांमध्ये वाढत आहे व्यसनाधीनतेचे प्रमाणगावात दारूचे दुकान असल्यामुळे युवकांमध्येसुद्धा व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत चालले असून, देशाचे भवितव्य समजली जाणारी युवा पिढी व्यसनापायी बरबाद होत असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झालेले आहे. सदर बाबीचा त्रास माता-भगिनींना मोठय़ा प्रमाणात सहन करावा लागतो. त्यामुळे गावात दारू उपलब्ध होऊच नये, अशी अपेक्षा सुज्ञ पालकवर्गाकडून व्यक्त केली जात असून, त्यांच्याकडून दारूबंदीसाठी आग्रह धरला जात आहे.