खामगाव : डॉक्टरांवर वारंवार होणा-या हल्ल्याच्या निषेधार्थ ७ व ८ सप्टेंबरला सर्व खासगी हॉस्पिटल बंद ठेवण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे. ५ सप्टेंबरला बुलडाणा शहरातील डॉ. मेहेर यांच्यावर एका आरोपीने रुग्ण तपासत असताना प्राणघातक हल्ला केला आहे.या हल्ल्यात डॉक्टरांच्या उजव्या डोळ्याला व चेह-याला गंभीर दुखापत झाली असून, फ्रॅक्चरसुद्धा झाले आहे. त्यामुळे या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागत आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे याचा निषेध म्हणून बुलडाणा मेडिकल असोसिएशनने ७ व ८ सप्टेंबरला सर्व खासगी हॉस्पिटल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनावर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एल. के. राठोड, सचिव ए. एस. भवटे, राज्यस्तरीय विशेष सदस्य डॉ. जे. बी. राजपूत यांच्या स्वाक्ष-या आहेत. या आंदोलनात खामगाव आयएमएनेसुद्धा पाठिंबा दर्शविला असून, दोन दिवस खामगाव शहरातील सर्व खासगी दवाखाने बंद राहतील, अशी माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. निलेश टापरे व सचिव गुरुप्रसाद थेटे यांनी दिली आहे.
डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ ७ व ८ सप्टेंबरला खासगी दवाखाने राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 10:06 PM