बुलडाणा : गत काही दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. या वातावरणामुळे वेगवेगळे आजार डोकेवर काढत आहेत. हे ढगाळ वातावरण अस्थमा रुग्णांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यात जुन्या रुग्णांचा उपचारात खंड पडणे महागात पडू शकते. त्यामुळे सध्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार घेणे महत्त्वाचे आहे.
अस्थमा रुग्णांसाठी बदलो वातावरण तसे त्रासदायक असते. परंतु सध्या कोरोनाचा संसर्ग आणि त्यात रोगराईला निमंत्रण देणारे हे वातावरण आहे. अस्थमाचे जे जुने रुग्ण आहेत, त्या रुग्णांना सध्या दम्याचा त्रास वाढत आहे. रुग्णालयात अशा रुग्णांची संख्याही वाढलेली दिसून येते.
इतर जंतूंचा धोका...
अस्थमा रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना इतर जंतूंचा धोका जास्त असतो.
सध्या व्हायरल इन्फेक्शन असल्याने सर्दी, खोकला, ताप यासह इतर आजारांचे रुग्ण वाढलेले आहेत.
बालकही होताहेत अस्थमाचे शिकार
अस्थमा हा केवळ वयोवृद्धांना नाही, तर युवक व लहान मुलांनाही याचा त्रास होतो. जिल्ह्यात पाच वर्षांपासूनच्या काही मुलांवर सध्या अस्थमाचा उपचार सुरू आहे.
तज्ज्ञ म्हणतात...
ढगाळ वातावरणात जुने जे अस्थमाचे रुग्ण आहेत, यांना ॲलर्जी, रिॲक्शन येणे असा त्रास होतो. त्यात दम्याचे प्रमाणही वाढत आहे. सध्या व्हायरल इन्फेक्शनसुद्धा आहे. त्यामुळे इतर जंतूंचे प्रमाण या रुग्णांवर लवकर अटॅक करतात. त्यामुळे रुग्णांनी वेळीच उपचार घ्यावे.
- डॉ. पंजाबराव शेजोळ, छाती व हृदयरोग तज्ज्ञ
ही घ्या काळजी
१. कुठल्याही परिस्थितीत डाॅक्टरांनी दिलेले नियमित वापराचे औषध बंद करू नका. कोणत्याही परिस्थितीत आपले औषध वेळेवर घेणे महत्त्वाचा उपाय आहे.
२. ॲलर्जीकारक वस्तूंशी संपर्क टाळा. अनेकदा दम्याबरोबर ॲलर्जिक सर्दीसुद्धा सोबत असते. त्यासाठी नाकातील स्टेरॉईड स्प्रे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुरू करा.