बुलडाणा : पूर्व काळातील वैभव हरविल्यामुळे भकास झालेल्या व जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरातील समस्या सोडविण्याबाबत पालिका प्रशासनाची भूमिका कारणीभूत ठरली असल्याची कबूली देत या समस्यांवर मात कर्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एप्रिल अखेर जिल्हा प्रशासनाची विशेष बैठक खुद्द मुख्यमंत्री घेतली, अशी ग्वाही नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी २८ मार्च रोजी विधानसभेत दिली. दरम्यान, जिल्हा मुख्यालयाच्या विकासासाठी मुख्यमंत्री बैठकीपूर्वी रोडमॅप निश्चित करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. बुलडाणा शहरातील विविध समस्यांककडे राज्यशासनाचे लक्ष वेधत आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमक भूमिका घेत मांडलेल्या लक्षवेधी सुचनेच्या अनुषंगाने नगर विकास राज्यमंत्री डॉ. रंजीत पाटील यांनी हे आश्वासन दिले. नैसर्गिक सौंदर्य व जैवविविधता असलेल्या बुलडाणा शहराची केल्या काही वर्षात वाताहत झाली आहे. मुबलकर जलसाठा असताना नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सुमारे ८० किमीच्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पाडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नाट्यगृहाचे दहा वर्षापासून बांधकाम रखडलेले आहे. वीज देयकांचा नियमित भरणा होत नसल्याने शहरातील मुख्य मार्गावरील पथदिवे बंद आहेत. दिवसागणीक समस्यांमध्ये भर पडत असताना शासन मात्र उदासीन आहे. हे सर्व मुद्दे लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडले आणि नागरिकांच्या तीव्र भावना निदर्शनास आणून दिल्या.
राज्यमंत्र्यांना धरले धारेवर
गेल्या तीन वर्षात १४ तारांकीत प्रश्न, २ वेळा अर्धासात चर्चा, अनेक कपात सुचना, ५ वेळा बैठका अशा संसदयी आयुधांचा वापर केल्यानंतरही गृहराज्यमंत्र्याकडून गुळगुळीत शब्दांव्यतिरिक्त कोणत्याही ठोस उपाययोजना होत नसल्याची जाणीव करून देत राज्यमंत्र्यांना आ. सपकाळ यांनी धारेवर धरले. राज्यपालांच्या अभिभाषणात शहराच्या विकासाबबात एका अक्षराचाही उल्लेख नसल्याचे त्यांनी अधोरेखीत केले. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण न झाल्याने बुलडाणा शहराला जाणीवपूर्वक वेठीस धरून भेदभाव केल्या जात असल्याची संतप्त भावना व्यक्त करीत घोषणा नको निधी द्या, अशी मागणी आ. सपकाळ यानी सभागृहात केली. माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनीही या लक्षवेधीवर सहभागी होत सपकाळांच्या प्रामाणिक भूमिकेचे समर्थन केले. मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, वित्तमंत्री, उर्जामंत्री अशी महत्त्वाची खाती विदर्भाकडे असताना विदर्भातीलच बुलडाणा शहराला न्याय मिळत नसले तर हे शासनाचे अपयश असल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली. सोबतच मुख्यमंत्र्यानीच समक्ष बैठ घेऊन लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली.
पालिका प्रशासनाची उदासिनता
विधीमंडळ पातळीवरील बैठखा निश्चितच पूर्ण समाधान देणार्या ठरल्या नसल्याची वस्तूस्थिती मान्यकरत शहराच्या समस्यांसाठी पालिका प्रशासनाची उदासिनता निश्चितच कारणीभूत ठरत असल्याची कबूलीच नगर विकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधीमंडळात दिली. यापूढे असे होऊ नये या करीता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालीच विशेष बैठक एप्रिल अखेर आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, बैठकीची विषय पित्रका आणि मुद्देनिहाय प्राधान्यक्रम व त्यावरील उपाययोजना सुद्धा निश्चित करून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी रोडमॅप ठरवू, असे नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले.