- सुधीर चेके पाटीललोकमत न्यूज नेटवर्कचिखली : सर्दी, खोकला, ताप हे आजार तसे पाहता नेहमीचेच, परंतू हीच लक्षणे ‘कोरोना’बाधितांमध्ये प्रामुख्याने दिसून येत असल्याचे सद्य:स्थितीत प्रत्येकाने या आजारांचा धसका घेतला आहे. असे असले तरी, ‘लॉकाडाउन’मुळे या सामान्य व संसर्गजन्य आजाराच्या रूग्णसंख्येतही कमालीची घट झालेली आहे. या आजारासंदर्भात तालुक्यात एका आठवड्यात किमान एक हजार असलेली रूग्णसंख्या सद्य:स्थितीत केवळ १४० वर आली आहे. संख्यात्मकदृष्ट्या रुग्णसंख्येत तब्बल ९० टक्याने घट झाली असल्याने ‘कोरोना’सारख्या महामारीच्या काळातही एक आरोग्यदायी व सुखद बाब यानिमित्ताने समोर आली आहे.चिखली तालुक्यातील एकूण सहा प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालयात सर्दी, ताप व खोकला या आजारासंदर्भाने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची माहिती स्थानिक ग्रामीण रूग्णालय प्रशासनाकडून घेतली. यानुसार गेल्या तीन आठवड्यात सर्दी, खोकला व तापेच्या रूग्णांमध्ये कमालीची घट झाली असल्याचे दिसून आले आहे. तालुक्यातील ग्रामीण भाग व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांचे आरोग्य प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालयावर निर्भर आहे. या रूग्णालयात एका आठवड्यात किमान १ हजार रुग्णांवर उपरोक्त आजारासंदर्भाने उपचार केले जातात. मात्र, सध्या ‘कोरोना’च्या पृष्ठभूमीवर देशभरात ‘लॉकडाउन’ असल्यामुळे या आजाराच्या रुग्णसंख्येत अभूतपूर्व अशी घट झालेली दिसून येत आहे. किमान १ हजार रुग्ण संख्येच्या तुलनेत सद्य:स्थितीत या रुग्णालयामध्ये येणाºया रुग्णांची संख्या केवळ १० टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. संचारबंदीमुळेही व्हायरल फ्ल्यूसारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव देखील कमी झाला असल्याने, महामारीच्या या संकटात देखील सामान्य आजाराच्या रूग्णसंख्येत झालेली ही घट निश्चितच तालुक्यासाठी आरोग्यदायी आहे. सात रुग्ण जिल्हा रुग्णालयात रेफरगेल्या ९ ते १७ एप्रिल पर्यंतच्या आठ दिवसांच्या कालावधीत एकूण केवळ १४३ रूग्ण या आजारासंदर्भाने उपचारासाठी दाखल झाले होते. यामध्ये तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रामधून अमडापूर व अंत्री खेडेकर प्रत्येकी १०, एकलारा २७, किन्होळा १६, शेळगाव आटोळ १३, उंद्री २७ असे एकूण १०३ तर चिखली ग्रामीण रुग्णालयात ४० असे एकूण १४३ रूग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. यापैकी १३६ रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तर आजाराची तीव्रता अधिक असलेल्या ७ रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयात रेफर केले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इमरान खान यांनी दिली आहे.
सर्दी, खोकला, ताप रुग्णांच्या संख्येत घट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 11:56 AM