सुधीर चेके पाटील / चिखली (जि. बुलडाणा):
खरे काम निष्काम ही ग्रामसेवा
झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा
राष्ट्रसंतांच्या या विचारांशी पाईक होण्याचा चंग तालुक्यातील मुंगसरी या गावाने बांधला आहे. राज्यात नावलौकिक मिळविलेल्या राळेगणसिद्धी, पाटोदा, हिवरेबाजार यांच्या यादीत आपल्या गावाचे नाव नोंदविण्यासाठी येथील ग्रामस्थांनी सामूहिक प्रयत्नांद्वारे गावात विविध योजना प्रभावीपणे राबवून आदर्श गावनिर्मितीसाठी पुढाकार घेतला असून, त्याची सुरुवात १00 टक्के शौचालय निर्मितीच्या उद्देशापासून केली आहे. चिखली या तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर आडवळणाचे, ७६५ लोकसंख्येचे मुंगसरी हे गाव. ग्रामपंचायत सदस्यांच्या अविरोध निवडीची परंपरा जोपासणार्या या गावातील विद्यमान तसेच माजी पदाधिकारी, सदस्यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी महिनाभरापूर्वी विकासाच्या दृष्टीने राज्यासाठी ह्यमॉडेलह्ण ठरलेल्या राळेगणसिद्धी, पाटोदा, हिवरेबाजार या गावांना भेटी देऊन ग्रामविकासाच्या महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास केला, नव्हे या गावांच्या यादीत आपल्या गावाचे नाव यायलाच हवे, हा ध्यास घेऊनच परतले. तेथील विकासाने भारावलेल्या ग्रामस्थांनी आपल्या या गावाचा कायापालट करण्याचा संकल्प केला असून, त्यांच्या संकल्पनेतील आदर्श गाव प्रत्यक्षात आणण्यासाठी यापूर्वी आदर्श म्हणून उभे असलेल्या राळेगणसिद्धी, पाटोदा व हिवरेबाजार या गावांनी ग्रामसुधारणेसाठी ज्याप्रमाणे सर्वप्रथम गावात शौचालयाची चळवळ राबविली, त्याप्रमाणे मुंगसरीवासीयांनी गत ३ जुलै रोजी ग्रामसभा घेऊन गाव हगणदारीमुक्त करण्याचा एकमताने ठराव घेतला आहे. याशिवाय गावाला आदर्श बनविण्यासाठी वनीकरण, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, आरोग्य, शिक्षण, विविध विकासकामांसह इतरही सर्व महत्त्वपूर्ण बाबी व योजना राबविण्याचा ठराव ग्रामस्थांनी घेतला आहे.