कोविड रुग्णांची वाढती संख्या आणि शासकीय रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या सुविधा पाहता खासगी रुग्णालयांचा काहींना आधार मिळाला आहे तर काहींचे प्राणही वाचले आहेत. दुसरीकडे शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर प्राथमिक उपचार होत आहेत. पण, व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयाशिवाय पर्याय नाही. शहरातील बहुतांश डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करून २४ तास सेवा देण्यात येत आहे. त्यामुळे या रुग्णालयांमधील मृत्युदर कमी असल्याचे सांगण्यात येते. ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवड्यावरही परिश्रमपूर्वक मात करण्यात येत आहे. मात्र समाजातून या डॉक्टरांचेच खच्चीकरण होत असून त्यांच्यावर गंभीर आरोप करून डॉक्टरांना मानसिक त्रास दिला जात असल्याची ओरड आहे. विशेषत: स्थानिक राजकीय हस्तक्षेप यात वाढल्याने खासगी आरोग्य यंत्रणाच शहरात तणावाखाली आली आहे. त्याच्या परिणामस्वरूप या खासगी कोविड रुग्णालयचालक डॉक्टरांनी टोकाचे पाऊल उचलत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडेच राजीनामे सादर केले आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व तहसीलदारांनाही याबाबत त्यांनी कळविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
--पालकमंत्री शिंगणेंच्या भूमिकेकडे लक्ष --
या प्रश्नी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आता कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. प्रामुख्याने सेवाकार्यात सततच्या होत असलेला स्थानिक राजकीय हस्तक्षेपासह अन्य काही बाबींचा उल्लेख सामूहिक राजीनाम्यात करण्यात आला आहे. त्यामुळे या कोराेनाच्या आपत्ती काळात आता पालकमंत्री डॉ. शिंगणे हे प्रकरण कसे हाताळतात याकडे सध्या लक्ष लागून आहे. श्री योगिराज हॉस्पिटल, सावजी, खंडागळे, दळवी, गुरुकृपा, गंगाई, तुळजाई, तायडे जयस्वाल हॉस्पिटलसह अन्य एका रुग्णालयातील डॉक्टरांनी हे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे चिखलीतील आरोग्य यंत्रणा प्रभावित होणार आहे.