बुलडाणा : लॉकडाऊनची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते किंवा नाही याबाबत जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी ६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरात प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरातील चिखली रोड, काँग्रेस नगर परिसर, बसस्थानक मार्ग व इतर प्रमुख मार्गाने जात पाहणी केली.
कला महाविद्यालयात निबंध स्पर्धा
बुलडाणा : येथील कला महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आजादी का अमृतमहोत्सव या केंद्र शासन निर्देशित उपक्रमांतर्गत विविध ‘महापुरुषांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान’ या विषयावर २५ ते ३१ मार्च या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात आली.
भाजयुमो महामंत्रिपदी मोहित भंडारी
बुलडाणा : भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष सोहम झाल्टे यांनी भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकारिणी घोषित केली. यामध्ये संघटनेतील अतिशय महत्त्वाचे असलेले शहर महामंत्रिपदी योगेंद्र गोडे यांचे समर्थक मानले जाणारे मोहित भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली.
शिंदी येथे ग्रामपंचायतीची आढावा बैठक
सिंदखेडराजा : तालुक्यातील शिंदी येथील ग्रामपंचायत कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ग्रामसेवक अर्जुन गवई यांनी गावातील जास्तीत जास्त लोकांनी कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन केले.
नियमांचे उल्लंघन करणााऱ्यांवर कारवाई
बुलडाणा : नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरात ७ एप्रिल रोजी मास्क न लावता फिरणाऱ्या व फिजिकल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. मास्क न लावणारे नागरिक व फिजिकल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
वीजबिल माफ करण्याची मागणी
लोणार : लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने तहसीलदार सैफन नदाफ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यामध्ये प्रामुख्याने कोरोनाकाळातील मार्च ते ऑगस्ट २०२० या काळातील २०० युनिटपर्यंत वीजबिल माफ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
विवाहितेचा छळ; चौघांविरुद्ध गुन्हा
बुलडाणा : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सागवन परिसरातील रहिवाशी ज्ञानेश्वर खर्चे यांची मुलगी प्रतीक्षा हिचा विवाह पुण्यात इंजिनिअर असलेल्या तुषार भारंबे याच्याशी १० जुलै २०१९ रोजी झाला होता.
मशागत खर्चात झाली मोठ्या प्रमाणात वाढ
मोताळा : रासायनिक खते, बी-बियाणे, डिझेलच्या किमती व मशागतीत भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सततच्या दुष्काळामुळे हैराण झालेला शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. वाढलेल्या किमती कमी करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
व्यापाऱ्यांनी केला बंदला विरोध
जानेफळ : जिल्ह्यात अत्यावश्यक सेवावगळता इतर सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यांच्या या आदेशाला येथील व्यापाऱ्यांनी विरोध केला. संतप्त व्यापाऱ्यांनी ६ एप्रिल रोजी ठाणेदार यांची भेट घेत आमची दुकाने उघडी ठेवा किंवा आम्हाला वेळेची मर्यादा द्या, अशी मागणी केली आहे.
जिल्ह्यात १४ खरेदी केंद्रांना मान्यता
बुलडाणा : रब्बी हंगामातील ज्वारी, गहू व मका आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कमी किमतीत धान्य विकावे लागू नये तसेच शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात १४ खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
संत रविदास नगरात घाणीचे साम्राज्य
चिखली : येथील प्रभाग क्रमांक पाचमधील संत रविदास नगरात मागील काही दिवसांपासून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरातील नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने रोगराईचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या प्रभागाची साफसफाई करून जंतुनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना दिलासा
बुलडाणा : गॅसजोडणी असल्यास शिधापत्रिका रद्द होणार असल्याने शिधापत्रिकाधारकांमध्ये धास्ती भरली आहे. शोधमोहिमेदरम्यान हमीपत्र भरून द्यायचे असल्याने शिधापत्रिकाधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आता मात्र तपासणी मोहीम स्थगित झाल्याने शिधापत्रिकाधारकांना दिलासा मिळाला आहे.
बसस्थानकात कोरोना नियमांचे उल्लंघन
बुलडाणा : वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. एसटी वाहतूक मात्र सुरू आहे. यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी होत असून, अनेकजण मास्क न लावताच वावरताना दिसून येतात. येथे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे.