लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: येथील खाऱ्या पाण्याच्या सरोवराचा गुलाबी झालेला रंग पुन्हा पुर्ववत झाल असल्याचे दोन जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता केलेल्या पाहणी दरम्यान समोर आले.त्यामुळे जवळपास २३ दिवस लोणार सरोवरातील पाणी हे गुलाबी रंगाचे झाले होते. नऊ जून रोजी सर्वप्रथम ही बाब समोर आली होती. त्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांसह राज्यभरातून पर्यटकांनी येथे येवून या पाण्याचा रंग गुलाबी झाल्याचे पाहले होते.दुसरीकडे नागपूर येथील निरी संस्थेच्याही तीन सदस्यांच्या पथकाने १४ जून रोजी लोणार येथे येऊन सरोवरातील गुलाबी झालेल्या पाण्याचे सहा ठिकाणचे नमुने घेतले होते. पुणे येथील आगरकर संशोधन संस्थाही सध्या यावर संशोधन करत आहे.सरोवरातील पाण्याचा गुलाबी रंग झाल्यामुळे नागपूर खंडपीठानेही पाण्याचा रंग गुलाबी होण्यामागील कारणांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नागपूर खंडपीठाने नियुक्त केलेल्या एका समितीने जून महिन्याच्या मध्यावर लोणार सरोवरास भेट देवून त्याची पाहणी केली होती. पाण्याच्या या रंग बदलामुळे लोणार सरोवराचे संरक्षण व संवर्धन होण्याच्या दृष्टीने प्रयत्नांनी वेग घेतला आहे.गुरूवारी दुपारी लोणार येथील छायाचित्रकार उमेश चिपडे हे सरोवराच्या काठावर गेले असता त्यांना कालपर्यंत गुलाबी दिसणारा सरोवरातील पाण्याचा रंग हा पुर्वीप्रमाणे सामान्य झाला असल्याचे निदर्शनास आले. जवळपास २३ दिवस या सरोवरातील पाणी हे गुलाबी रंगाचे दिसत होते.दरम्यान, सात जुलै रोजी लोणार सरोवर विकास व संवर्धनासंदर्भात नागपूर खंडपीठात सुनावणी होत आहे. याच दरम्यान आता हे पाणी पुन्हा सामान्य झाले आहे. आता हे सामान्य झालेले पाणी पाहण्यासाठीही स्थानिकांनी येथे गर्दी केली होती.
लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग पुर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 11:18 AM