देऊळगाव राजा: ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रामा केअर सेंटरमध्ये शुक्रवारी पंचवीस आरोग्य कर्मचाऱ्याची निवड करून ड्राय रन कोरोना व्हॅक्सिनचे प्रात्यक्षिक यशस्विरीत्या पार पडले. या ड्राय रन प्रात्यक्षिक प्रसंगी अनेक मान्यवरांनी भेटी देऊन लसीकरणासंदर्भात माहिती समजून घेतली.
जिल्हा आरोग्य विभागामार्फत पुढील काळात कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यापूर्वी सदर लसीकरणाचे प्रात्यक्षिक ड्राय रनसंदर्भात सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सांगळे यांनी स्थानिक आरोग्य प्रशासनाला यापूर्वीच मार्गदर्शन केले होते. त्यानुसार शुक्रवारला स्थानिक ट्रामा केअर सेंटरमध्ये ड्राय उपक्रमानुसार आरोग्य विभागातील २५ कर्मचाऱ्यांवर लसीकरणाचे प्रात्यक्षिक यशस्वीपणे करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दत्ता मांटे यांनी मार्गदर्शन केले. ड्राय रन प्रात्यक्षिक कार्यक्रमास सामाजिक व राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन आरोग्य विभागाकडून माहिती समजून घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसीलदार डॉ सारिका भगत, आरोग्य अधीक्षक डॉ. अस्मा शाहीन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दत्ता मांटे यांच्यासह आरोग्य विभागाने पुढाकार घेतला. याप्रसंगी आरोग्य विभागाचे सुपरवायझर, आरोग्य सहायक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.