बुलडाणा: भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानाचा निषेध करून जिल्हाभर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दानवे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. देऊळगावराजा : राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने स्थानिक बस स्थानक चौकात जालन्याचे खासदार तथा भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पुतळा जाळण्यात आला. भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांच्या विरोधात अपशब्दांचा वापर करीत आहेत. दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे विधान केले आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या या वक्तव्याचा निषेध करीत तसेच रावसाहेब दानवे यांनी सर्व पदाचे राजीनामे देऊन शेतकऱ्यांना अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जागा दाखवून देणार, असे निवेदनात म्हटले आहे. स्थानिक बस स्थानक चौकात जालन्याचे खासदार तथा भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला व तहसीलदार दीपक बाजड यांना निवेदन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे नगरपालिका गटनेत्या सुनीता सवडे, माजी नगराध्यक्ष सरस्वती टेकाळे, नगरसेविका रंजना शिंगणे, नगरसेविका दीपमाला गोमधरे, माजी नगरसेविका रिता जिंतूरकर, माजी नगराध्यक्ष कविश जिंतुरकर, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष सदाशिव मुंडे, गणेश सवडे, नवनाथ गोमधरे, अरविंद खांडेभराड, धनंजय मोहिते, सरपंच शिवहरी शिंगणे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष हनिफ शाह, नगरसेवक मो.रफीक, माजी नगरसेवक इस्माईल बागवान, अतिष कासारे आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाभर दानवेंच्या पुतळ्याचे दहन
By admin | Published: May 12, 2017 8:04 AM