देऊळगाव राजा (बुलडाणा) : खडकपूर्णा धरणातून जालना जिल्ह्यातील मंठा व परतूर तालुक्यातील ९२ गावांसाठी मंजूर करण्यात आलेल्या ग्रीड पाणीपुरवठा योजनेच्या विरोधात नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तालुक्यातील २२ गावांत पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पुतळ्यांचे शनिवारी रात्री निषेधाच्या घोषणा देत दहन करण्यात आले.तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेत प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेच्या विरोधात ठराव घेतले. देऊळगाव राजा व सिंदखेडराजा तालुक्यातील गावांचा या पाण्यावर प्रथम हक्क आहे; परंतु पाण्यापासून तीच गावे वंचित असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. खडकपूर्णा पाणी बचाव संघर्ष समितीने गावागावात जाऊन जनजागृती केल्यानंतर जनभावना संतप्त झाल्या आणि त्याचाच परिणाम शनिवारी रात्री दिसून आला. पुतळा दहनापूर्वी सकाळी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा झाल्या. त्यामध्ये प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेला विरोध दर्शवून ती रद्द करण्यात यावी, देऊळगाव राजा व सिंदखेडराजा तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातून योजनेची पाइपलाइन जाणार आहे. त्यासही विरोध आहे.मतदारसंघासाठी...पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी त्यांच्या मतदारसंघातील ९२ गावांसाठी खडकपूर्णा धरणातून ग्रीड पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली व लगेच कंत्राटदाराला काम सुरू करण्यास सांगितले. धरणपात्रात चरी खोदून विहिरीच्या खोलीकरणाचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू केले.
पाणीपुरवठा मंत्र्यांच्या पुतळ्यांचे २२ गावांमध्ये करण्यात आले दहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 2:10 AM