धाड (बुलडाणा): प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याबाबत सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी बुलडाणा जिल्ह्यातील धाड पोलीस स्टेशनला तृप्ती देसाई विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रहारचे जिल्हाध्यक्ष वैभव मोहिते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी २ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला.
तृप्ती देसाई यांच्या फेसबुकवरून आ. बच्चू कडू यांच्या संदर्भात बदनामीकारक मजकूर व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणाचा प्रहार जनशक्तीकडून तीव्र निषेध नोंदविण्यात आला. धाड पोलीस ठाण्यात मोहिते यांनी तृप्ती देसाई यांच्या विरोधात तक्रार दिली. दरम्यान, तृप्ती देसाई यांनीही बच्चू कडू यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. तृप्ती देसाई यांनी आमदार बच्चू कडू यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुम्ही गप्प का ? असा सवाल फेसबुकवर विचारला होता, यावर आमदार बच्चू कडू समर्थकांनी देसाई यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या कमेंट केल्या यावर तृती देसाई यांनी आमदार कडू यांना संपर्क साधला होता. यावर त्यांची चर्चा चालू असतानाच कार्यकर्तांच्या टिप्पणीबाबत बोलणे सुरू होते. तुम्ही मला फेसबुकवर उपदेश देऊ नका , स्वत: ला मोठे समजू नका , शहाणपणा करू नका , अन्यथा तुम्हाला परिणामांना समोरे जावे लागेल, अशी आमदार बच्चू कडू यांनी धमकी दिल्याचे तक्रारदार देसाई यांनी सांगितले.