संदीप वानखडे
बुलडाणा : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाय याेजनांचा परिणाम आता समाेर येत असून अर्ध्यापेक्षा अधिक बेड रिक्त असल्याचे चित्र आहे़ काेराेना रुग्णांची संख्या घटली असून बरे हाेणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने हे दिलासादायक चित्र आहे़ जिल्ह्यातील विविध रुग्णालयात ७१६ सर्वसाधारण बेड रिक्त आहेत़ तसेच ऑक्सिजनयुक्त २३७ बेड रिक्त आहेत़
जिल्ह्यात जानेवारी महिन्यांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे़ मार्च, एप्रिल महिन्यात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत हाेती़ त्यामुळे, काेराेना पाॅझिटीव्ह रुग्णांना बेड मिळवण्यासाठी माेठा संघर्ष करावा लागत हाेता़ त्यातच ऑक्सिजन बेड मिळणे कठीण झाले हाेते़ काही जणांना केवळ बेड न मिळाल्याने आपला प्राण गमवावा लागला हाेता़ वाढलेला संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्बंध लागू केले़ तसेच आराेग्य विभागाने विविध उपाय याेजना राबवल्याने मे महिन्याच्या शेवटी शेवटी रुग्णसंख्या आटाेक्यात आणण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे़ दहा दिवस कडक निर्बंध लावण्यात आल्याने काेराेना संसर्गाची साखळी काही प्रमाणात ब्रेक झाली आहे़ त्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत़ जिल्ह्यात काेराेना पाॅझिटीव्ह रुग्णांपेक्षा बरे हाेणाऱ्यांची संख्या जास्त आहे़ त्यामुळे, विविध रुग्णाालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अर्ध्यावर आली आहे़
ठाेस उपाय याेजनांमुळे यश
जिल्हा प्रशासनाने काेराेनाची दुसरी लाट राेखण्यासाठी ठाेस उपाय याेजना सुरू केल्या आहेत़ गावाेगावी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येत आहेत़ त्यामुळे, काेराेना संसर्ग वाढण्यावर काही प्रमाणात मर्यादा आल्या आहेत़ तसेच वाढती रुग्णसंख्या पाहता काेविड सेंटरला जिल्हा प्रशासनाच्या तातडीने मान्यता देण्यात आली़ जिथे व्यवस्था असेल तिथे काेविड सेंटर उभारण्यात येत आहे़ त्यामुळे, रुग्ण संख्या कमी हाेत आहे़
पुन्हा उद्रेकाची शक्यता
जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंधानंतर २० मे पासून सकाळी ७ ते ११ भाजीपाला, किराणा दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे़ या वेळेत बुलडाणा शहरासह ग्रामीण भागातही माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत आहे़ तसेच नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास काेराेनाचा पुन्हा उद्रेक हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे, नियमांचे पालन करण्याची गरज आहे़
एका क्लिकवर रिक्त बेडची माहिती
गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत़ त्यामुळे, जिल्ह्यातील काेणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत याची माहिती एका क्लिकवर मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़ https://covid19buldana.in/ या वेबसाईटवर जिल्ह्यातील रुग्णालय निहाय रिक्त जागांची माहिती उपलब्ध आहे़ तसेच ती दिवसभर अपडेट करण्यात येत असल्याने अद्ययावत माहिती मिळत आहे़