कृषी केंद्रांनी जुन्याच दराने खत विक्री करावी
बुलडाणा : जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून आगामी खरीप हंगामासाठी रासायनिक खते व बियाणे खरेदीची लगबग सुरू आहे. एप्रिल २०२१ पासून युरिया वगळता इतर रासायनिक खतांची दरवाढ खत उत्पादक कंपन्यांनी केली होती. केंद्र शासनाने २० मे २०२१ च्या निर्देशानुसार या कंपन्यांना वाढीव किमतीसाठी अनुदान देण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे खत विक्रेता दुकानदारांनी खते जुन्याच दराने विक्री करावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे़
मायक्रो फायनान्सची वसुली थांबवा
सुलतानपूर : लॉकडाऊनमध्येही मायक्रो फायनान्सची वसुली जोमात सुरूच आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न कर्ज घेणाऱ्यांना पडला आहे. ही वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.
रेनवॉटर हार्वेस्टिंग राबविण्याची मागणी
बुलडाणा : पाणीटंचाईचा सामना करताना भूजलाचा उपसा करण्याऐवजी पाणीटंचाई नसताना भूजलाची पातळी वाढवण्यासाठी प्रत्येक मालमत्तेवर रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना राबविणे महत्त्वाचे आहे, असे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले.
डाेणगावात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
डोणगाव : काेराेना रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले असून, जीवनाश्यक वस्तूंची दुकाने दिवसभर उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. डाेणगाव येथे जीवनाश्यकसह इतरही दुकाने सुरू ठेवण्यात येत असून, दुकानांमध्ये माेठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे़
गुरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
बिबी : पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने गुरांसाठी चाऱ्याची साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. बैलगाडीच्या साह्याने शेतकरी चारा गाेळा करीत आहेत़ पेरणीच्या दिवसांमध्ये गुरांचा चारा साठा करून ठेवावा लागताे़
रस्त्यांच्या कामाला मिळेना गती
किनगाव राजा : परिसरातील अनेक रस्त्यांच्या कामाला गती मिळत नसल्याने ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. उमरद शिवारातही अनेक रस्त्यांचे काम रखडले आहे. गावादरम्यान थोडेसे रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
घरचे साेयाबीन बियाणे वापरा
बुलडाणा : सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २ वर्षांपर्यंत वापरात येते. स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल, असे आवाहन कृषी विभागाने केले.
अवैध गुटखा विक्री सुरूच
देउळगाव राजा : शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. सर्वच दुकानांना सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे़ यादरम्यान अवैध गुटखा विक्री माेठ्या प्रमाणात हाेत असल्याचे चित्र आहे़ याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे़
कारागिरांना मदत देण्याची मागणी
मेहकर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र कडक निर्बंध लावण्यात आले हाेते. त्यामुळे, स्थानिक बसस्थानकासमोर दगडाचे नंदी, महादेव, जातं आदी स्वतःच्या कलाकुसरीने तयार करून रस्त्यावर पाल करून राहणाऱ्या काही परिवारांवर उपासमारीची वेळ आली आहे़.
कायम ग्रामसेवक देण्याची मागणी
ईसाेली : चिखली तालुक्यातील ईसोली ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्याची मागणी सरपंच व सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. ग्रामसेवक नसल्याने विकास कामे खाेळंबली आहेत़
विद्यार्थ्यांचे पुढील वर्षही घरातच
बुलडाणा : कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे मागील शैक्षणिक वर्षात पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शाळा वर्षभर बंदच राहिल्या. नर्सरीत प्रवेश झालेल्या चिमुकल्यांना स्कूल, टीचर भेटलेच नाही अन् शाळादेखील पाहायला मिळाली नाही.