लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यासाठी आयोजित सभेत, सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी एकमेकांवर केलेल्या टीका-टिप्पणीमुळे शनिवारची सभा चांगलीच गाजली. तथापि, या सभेत तब्बल ३२ विषयांना मंजुरी देण्यात आली. यामधील बहुतांश विषयांवर सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमत झाले.नगरपालिकेमध्ये आयोजित सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करणे, नगर परिषद प्राथमिक शाळांना इयत्ता ५ ते ८ वीचे वर्ग जोडणे, पालिकेतील वाहनांवर अभिकर्त्यांमार्फत वाहनचालकाची सेवा पुरविण्याबाबतच्या वार्षिक कंत्राटास मंजुरी देणे, फेरीवाला झोन ठरविण्यासाठी विचार विनिमय करून निर्णय घेणे, यांसह विविध विषयांच्या मंजुरीसाठी सर्वसाधारण सभा पालिका सभागृहात आयोजित करण्यात आली. यापैकी बहुतांश विषयांवर सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमत झाले. दरम्यान, या सभेत विरोधी सदस्यांकडून कोणतीही उपसूचना न आल्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी विषयाला सोडून वैयक्तिक टीका-टिप्पणी झाल्याने, पालिकेची ही सभा चांगलीच गाजली. या सभेला नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी अनिता डवरे, उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, काँग्रेसच्या गटनेत्या अर्चना टाले, पाणी पुरवठा सभापती सतीशआप्पा दुडे, आरोग्य सभापती राजेंद्र धनोकार, संदीप वर्मा, अलकादेवी सानंदा, अमय सानंदा, ओम शर्मा, देवेंद्र देशमुख विजय वानखडे, हिरालाल बोर्डे, प्रवीण कदम, भूषण शिंदे आदींची उपस्थिती होती. पालिकेतील सभेची सुरुवात राष्ट्रगीताने! नगरपालिकेतील आयोजित प्रत्येक सभेची सुरूवात राष्ट्रगीताने करण्याच्या ठरावाला शनिवारी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. नगरपालिकेत आयोजित सभेची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यासाठी नगरसेवक ओम शर्मा यांनी पालिकेला पत्र दिले होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनीही हा विषय सुचविला होता. या विषयावरून पालिकेची मागील सभा चांगलीच गाजली होती. शहरातील चारही पाणी टाक्यांची जोडणी!वाढीव पाणी पुरवठा योजनेची गती वाढविण्यासाठी शहरात कार्यान्वित असलेल्या चार पाण्याच्या टाक्यांच्या अंतर्गत जोडणीच्या विषयाला शनिवारी मंजुरी देण्यात आली. चारही पाण्याच्या टाक्यांची जोडणी झाल्यास शहरातील पाणीटंचाई संपणार आहे.
टीका- टिप्पणीने गाजली खामगाव पालिकेची सभा
By admin | Published: July 02, 2017 9:12 AM