ओमप्रकाश देवकर । लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम: साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे देशभरातून सहा निमंत्रणे आली होती. त्यापैकी दिल्ली मराठी प्रतिष्ठान, मराठी वाड्.मय परिषद बडोदा आणि विवेकानंद आश्रम, हिवरा आश्रम या तीन संस्थांत मोठी चुरस निर्माण झाली होती. त्यातून बडोदा मागे पडले असून, दिल्ली की हिवराआश्रम हेच अंतिम स् पर्धेत उरले आहेत. साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती आता ९ सप्टेंबर शनिवारला हिवरा आश्रमला येणार असून, भेट देऊन पाहणी केल्यानंतर आपला अहवाल व शिफारस महामंडळाकडे सादर करणार आहे. रविवारी १0 सप्टेंबरला नागपूर येथे साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत संमेलनस् थळाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या निमंत्रणाला मराठी साहित्य परिषदेनेही पाठिंबा दर्शविल्याने तब्बल ६४ वर्षांच्या खंडानंतर दिल्लीमध्ये साहित्य संमेलन आयोजित होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. तर हिवरा आश्रम येथेच साहित्य संमेलन घेण्यात यावे, यासाठी विदर्भासह मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील साहित्यिकांनी महामंडळाकडे आग्रह धरलेला आहे. त्यामुळे हिवरा आश्रम की दिल्ली, असा मोठा पेच निर्माण झाला आहे.
दिल्लीपेक्षा हिवरा आश्रमच सोयीस्कर!साहित्य संमेलनासाठी स्थळ निवडण्यासाठी महामंडळाने काही निकष निश्चित केलेले आहेत. त्या त प्रामुख्याने वाहतूक व्यवस्था, निवास व भोजन व्यवस्था आणि नियोजनाच्या सुविधा. या निकषांवर उतरणारे स्थळ साहित्य महामंडळ संमेलनासाठी निश्चित करत असते. हिवराआश्रम येथे या सर्व सुविधा उपलब्ध असून, किमान एक लाख साहित्यरसिकांची निवास, भोजन आणि इतर सर्व सोय विवेकानंद आश्रमातर्फे करता येऊ शकते. त्यापेक्षाही जास्त साहित्यिक, रसिक आले तरी अगदी सहजपणे या सुविधा दिल्या जाऊ शकतात. विवेकानंद आश्रम हे मराठवाडा व विदर्भातील मध्यवर्ती ठिकाण आहे. विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणूनही या छोटेखानी शहराकडे पाहिले जाते. राज्यासह देशाच्या कानाकोपर्यातून साहित्यरसिक येथे आरामशीर येऊ शकतात. संमेलनासाठी दोन किंवा चार भव्य व्यासपीठ, रसिकांसाठी मुबलक जागा, मुबलक मनुष्यबळ विवेकानंद आश्रमाकडे आहे. दरवर्षी तीन लाख भाविकांचा सहभाग असलेला विवेकानंद जन्मोत्सव आयोजनाचा प्रदीर्घ अनुभव आश्रमाकडे आहे. त्यामुळे मराठी साहित्य महामंडळाच्या सर्व निकषात विवेकानंद आश्रमाचा प्रस्ताव पूर्णपणे बसतो.
विवेकानंद आश्रम, दिल्ली मराठी प्रतिष्ठानमध्ये चुरस..महामंडळाच्या स्थळ निवड समितीने दिल्ली आणि बडोदा येथे भेट दिली असून, शनिवारी ही समिती विवेकानंद आश्रमास भेट देणार आहे. दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या निमंत्रणास दिल्ली मराठी साहित्य परिषदेनेही पाठिंबा दर्शविला आहे. या संमेलनाच्यानिमित्ताने दिल्लीतील मराठी समाज एकत्र येईल, असा विश्वास दिल्ली मराठी साहित्य परिषदेचे समन्वयक विजय सातोकर यांनी व्यक्त केला आहे. तर विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी सांगितले की, मराठी साहित्य ग्रामीण भागात प्रवाहित झाले असून, साहित्यदेवतेची सेवा करण्याची संधी मिळावी, असा आमचा प्रयत्न आहे. दरम्यान, महाराष्ट्राबाहेरच्या साहित्य संमेलनाचा अनुशेष मोठा आहे. त्यामुळे राज्याबाहेर संमेलन आयोजित करण्यास हरकत नाही, असे मत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी व्यक्त करून आपला कल दिल्लीच्या बाजूनेच असल्याचे स्पष्ट केले. तरीही स्थळनिवड समिती काय अहवाल देते व त्यावर महामंडळाचे पदाधिकारी काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल, असेही जोशी म्हणाले.