यावेळी कृषी हवामानतज्ज्ञ मनेश यदुलवार व कृषी हवामान निरीक्षक अनिल जाधव हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. जागतिक पातळीवर होत असलेला हवामान बदल व त्याचा शेतीवर होत असलेला परिणाम याबाबत मनेश यदुलवार यांनी सखोल विचार मांडले. बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे जरुरीचे आहे, त्यासोबत जिल्हा कृषी हवामान केंद्राद्वारे विस्तारित करण्यात येत असलेली हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिका प्रत्येक शेतकऱ्याने समजून घ्यावी व तिचा शेती व्यवस्थापनात वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भारत सरकारने भारतीय हवामान खात्याच्या साहाय्याने विकसित केलेले ‘मेघदूत व दामिनी’ ॲप शेतकऱ्यांच्या दैनंदिनीमध्ये हिताचे आहे, असे यदुलवार यांनी स्पष्ट केले. वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्नधान्याचा पुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी शेतकऱ्यांनी हवामान साक्षर होऊन आपापल्या शेतीची उत्पादकता वाढविली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले. जिल्हा कृषी हवामान केंद्र हे कृषी विज्ञान केंद्राच्या फलाटाचा उपयोग करून हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला पत्रिका (तालुकानिहाय व पीकनिहाय) जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा पोहोचविते, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे योग्य व्यवस्थापन करता येते. जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या अचूक व योग्यवेळी सातत्याने प्रसारित व विस्तारित होणाऱ्या हवामान आधारित कृषी सल्ल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते व ही शेती उत्पादनातील वाढ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राष्ट्रीय विकास दरात निश्चितच भर घालणारी ठरू शकते, असे मत मनेश यदुलवार यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव टोम्पे, संस्थापक अध्यक्ष पदवीधर संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी केले. या ऑनलाइन कार्यक्रमाचा जिल्ह्यातील व विदर्भातील प्रामुख्याने युवा शेतकरी व इतर शेतकरी बांधवांनी लाभ घेतला.