जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. लोणार तालुक्यातल जवळपास २०१३ नंतर प्रथमच एवढा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले. संततधार पावसामुळे झालेल्या मोठ्या प्रमाणावरील नुकसानामुळे शासकीय यंत्रणेला पंचनामा करण्याचे फर्मान सोडण्यात आले होते. मात्र, नुकसानासंदर्भातील सर्वेक्षण योग्यपद्धतीने झाले नसल्याची अेारड असून, लोणार तालुक्यातील हजारो शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहे.
संततधार पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांना कोंब फुटल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. सोयाबीनचेही मोठे नुकसान खरिपात झाले होते. लागवड खर्चही निघणे दुरापास्त झाले होते. अशीच स्थिती उडीद पिकाचीही होती. त्यामुळे गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांसमोर असलेल्या आणि आलेल्या अडचणींचा विचार करता लोणार दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशा एखाद्या घोषणेची अपेक्षा आहे. त्यामुळे शुक्रवारच्या त्यांच्या दौऱ्याकडे सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.