चिखली (जि. बुलडाणा): हाताची शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयातील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सुभाष चव्हाण यांनी १0 हजार रुपये मागितल्याची तक्रार आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे सिंदखेडराजा तालुक्यातील लिंगा येथील दिगंबर जयराम भालेराव यांनी बुधवारी केली. दिगंबर भालेराव यांच्या जावयाचा हात मोडला असल्याने त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी येथे कार्यरत अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुभाष चव्हाण यांनी १0 हजार रुपयांची मागणी केली असल्याचा आरोप भालेराव यांनी केला. १0 हजार रुपये दिले, तरच उपचार होतील, असे सांगत तब्बल दहा दिवस रुग्णालयात दाखल ठेवूनही डॉ. चव्हाण यांनी काहीही केले नाही. रुग्णालयात दाखल प्रत्येक रुग्णास बाहेरून औषधी आणावयास सांगितले जाते, असा आरोपही भालेराव यांनी केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिकार्यांकडे तक्रार करून महिना उलटूनही काहीच कारवाई झाली नाही, असा आरोपही दिगंबर भालेराव यांनी केला. याप्रकरणी न्याय देण्याची मागणी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान, यासंदर्भात डॉ.चव्हाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
शस्त्रक्रियेसाठी पैसे मागितल्याची तक्रार
By admin | Published: March 24, 2015 1:12 AM