खामगाव: शहरातील महिला आणि मुलींना निर्भिडपणे जगता यावे तसेच समोर न येता तक्रारी करण्यासाठी खामगावात यापूर्वी राबविण्यात आलेला तक्रार पेट्यांचा उपक्रम खामगावात पुन्हा सुरू करण्यात आला आहे. सोमवारी जुन्या तक्रार पेट्या दुरूस्त करण्यासोबतच तब्बल ११५ ठिकाणी तक्रार पेट्या बसविण्यात आल्यात.
तत्कालीन पोलीस निरक्षक यु. के. जाधव यांनी खामगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध संकल्पनांना मूर्त रूप दिले. महिला व विद्यार्थिनींना टवाळखोरांकडून होणारा त्रास दूर करण्याकरिता महिला तक्रार निवारण पेट्या हा उपक्रम सुरू केला. या तक्रार पेट्यांमध्ये येणाऱ्या तक्रारींची शहानिशा करून शहर पोलिसांच्या वतीने योग्य ती कारवाई केली जात होती.
यामुळे त्यावेळी शहरातील टवाळखोरांना वेसण लागले होते. दरम्यान, यु. के. जाधव यांची बदली झाल्यानंतर महिला तक्रार पेट्यांकडे दुर्लक्ष झाले. अनेक वेळायाबाबत मागणी झाली परंतु हा उपक्रम पुन्हा प्रभावीपणे राबविण्यात आला नाही. दरम्यान आता शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेले पोलिस निरिक्षक शांतीकुमार पाटील यांनी महिला तक्रार पेट्या हा उपक्रम पुन्हा सुरू केला आहे.
तक्रारदारांची नावे राहतील गुप्त
शहरातील शाळा महाविद्यालय, गर्दीच्या तसेच वर्दळीच्या ठिकाणांसह बसस्थानकावर तक्रार पेटी लावण्यात आली आहे. ही तक्रार पेटी दर शनिवारी सर्व तक्रार पेट्या उघडण्यात येऊन त्यातील तक्रारींची दखल घेतली जाणार आहे. तसेच मुली व महिला यांना काही अडचणी असल्यास शहर पोलीस स्टेशनच्या फोन क्रमांक ०७२६३- २५२०३८ यावर किंवा ११२ या हेल्पलाईन नंबरवर देखील तक्रार करू शकतात, असे आवाहन करण्यात आले आहे.
खामगाव शहरात नव्याने महिला तक्रार पेटीचा उपक्रम पुन्हा राबविण्यात येणार आहे. त्या दृष्टीकोनातून १५ ठिकाणी नवीन तर काही िठकाणी सुसि्थतीत असलेल्या पेट्या स्वच्छ करून कार्यान्वीत केल्या आहेत. महिला व विद्यार्थिनी यांनी त्यांना टवाळखोरांकडून होणारा त्रास तसेच इतर काही अडचणी असल्यास त्याबाबत लेखी स्वरूपात नावानिशी तक्रारी टाकाव्या.
शांतीकुमार पाटीलपोलीस निरिक्षक, शहर पोलीस स्टेशन, खामगाव.