योगेश फरपट/खामगाव : महाराष्ट्र हायब्रीड सीड कंपनी (महिको) विरुद्ध मंगळवारी रात्री 3 वाजता मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. या कंपनीने कापूस बियाणे साठवणूक व परवाना नसताना बियाणे विक्री केली आहे. राज्यातीलच नव्हे तर देशातील नामांकित कंपनी असलेल्या महिकोमध्ये बोगस बियाणे साठवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरुन बुलडाणा पोलिसांनी ८ डिसेंबररोजी रात्री ६ गोडावून सिल केले होते. त्यानंतर दुस-या दिवशी कृषी विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईनंतर बी.टी. कपाशीचे नमुने तपासणीसाठी घेऊन येथील गोडावून सील करण्यात आले होते. धानोरा येथील महिको कंपनीतील बोगस बियाण्याची शहानिशा करण्यासाठी कृषी विभाग व बीज प्रमाणिकरण यंत्रणेच्या अधिका-यांनी महिकोतील सर्वच गोडावूनमधील सर्व प्रकारच्या भाजीपाला बियाण्यांची सुद्धा तपासणी मागील दोन दिवसात पूर्ण केली.
दरम्यान रविवारी नांदुरा येथील मुख्यमंत्र्यांची सभा झाल्याच्या दुस-या दिवशी म्हणजे आज कृषी विभागाचे पथक मलकापूरात पुढील कारवाईसाठी दाखल झाले होते. दिवसभर फौजदारी कारवाईच्या अनुषंगाने कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु होती. त्यासाठी अधिकारी सोमवारी रात्री उशिरापर्यंत मलकापूरात ठाण मांडून होते. सोमवारी तांत्रिक अडचणीमुळे गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे मंगळवारी पुन्हा कागदपत्र जुळवाजुळव सुरू होती. अखेर मंगळवारी रात्री 3 वाजता प्राप्त झालेल्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये महिको कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध कापूस बियाणे साठवणूक व विना परवाना बियाणे विक्री केल्या प्रकरणी कलम 420, 468, 471, जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 3/7 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
कोट्यवधी रुपयांचा अवैध साठाकृषी विभागाला महिको कंपनीत कोट्यवधी रुपयांचा अवैध साठा आढळला. यामध्ये भाजीपाला बियाणे 9764. 11 क्विंटल, 436. 14 क्विंटल हरभरा बियाणे व बीटी कपाशी बियाणे 59 हजार 497 क्विंटल बियाण्याचा समावेश आहे.