नांदुरा (जि. बुलडाणा): तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाईची समस्या भीषण झाली असून, प्रशासनाने पाणीटंचाईची कामे प्राधान्याने करावी, अशी सूचना आमदार चैनसुख संचेती यांनी प्रशासनाला २२ मार्च रोजी पंचायत समितीच्या आवारात आयोजित वार्षिक आमसभा व सरपंच मेळाव्यात दिले. मागील कार्याचा आढावा घेऊन नवीन वर्षातील कामकाजाच्या रूपरेषेबाबत यावेळी चर्चा झाली.नांदुरा पं.स.च्या आमसभा व सरपंच मेळाव्याचे आयोजन पं.स. आवारात करण्यात आले होते. यावेळी बलदेवराव चोपडे जि.प. सदस्य, वसंतराव भोजने जि.प. सदस्य, सभापती अनिल इंगळे, उपसभापती सुनीताताई डिवरे, पं.स. सदस्या ज्योतीताई भोपळे, पं.स. सदस्या अर्चनाताई पाटील, पं.स. सदस्य जय प्रसादसिंग जाधव, पं.स. सदस्य प्रसाद जवरे, पं.स. सदस्य रामदास हळदे, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पाटील, गटविकास अधिकारी मारकड, तहसीलदार देवकर, सरपंच संघटनेचे कळसकार, रामकृष्ण पाटील आदी यांची प्रमुख उपस्थिती होती. गटविकास अधिकारी मारकड यांनी प्रास्ताविकातून पं.स.च्या कामाकाजाचा आढावा मांडला. शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी शाळांना व्यवसायीक दराने वीज बिल देवून महावितरण शाळांची लुट करीत असल्याबाबतचे वास्तव मांडले. यावर आ.संचेती यांनी यापुढे घरगुती दरानेच बिले येतील असे सांगितले. मग्रारोहयोच्या मजुरांना महिना ते दोन महिने उशिराने मजुरी मिळत असल्याच्या मुद्यावर चर्चा झाली व यापुढे नियमित मजुरी तात्काळ देण्याच्या सूचना आ.संचेती यांनी दिल्या. तसेच ऑपरेटर नसल्याने जॉब कार्डचे काम कासवगतीने होत असल्याबाबतच्या तक्रारी मांडल्यानंतर संचेती यांनी उपजिल्हाधिकारी घेवंदे यांना दूरध्वनीवरून सूचना देऊन तीन दिवसांत संगणक परिचालक देण्याचे सूचित केले. राज्य शासनाने व प्रामुख्याने आमदार संचे ती यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न केल्याने धन्यवाद प्रस्ताव मांडण्यात आला.
पाणीटंचाईची कामे प्राधान्याने पूर्ण करा
By admin | Published: March 24, 2015 1:07 AM