लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत गजानन महाराजांच्या शेगांवचा विकास आराखडा शासन राबवित आहे. या आराखड्यातंर्गत बरीच कामे पुर्ण झाली आहे. त्याचप्रमाणे माँ जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा परीसर विकास आराखडा, लोणार सरोवर विकास आराखडा व संत चोखामेळा जन्मस्थान विकास आराखडा जिल्ह्यासाठी शासनाने मंजूर केला आहे. या सर्व आराखड्या अतंर्गत सुरू असलेली कामे कालमर्यादेत पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्ह्यातील शेगांव, सिंदखेड राजा, लोणार व संत चोखामेळा जन्मस्थान विकास आराखडा आढावा बैठक १९ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जि. प. अध्यक्षा उमाताई तायडे, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, विभागीय आयुक्त पियुष सिंग, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, शेगांवच्या नगराध्यक्षा शकुंतला बूच, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे उपस्थित होते.शेगांव विकास आराखड्यातंर्गत अपूर्ण १३ कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देत पालकमंत्री म्हणाले, आराखड्यातंर्गत मल: निस्सारण प्रकल्प करण्यात आला आहे. या प्रकल्पातंर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्ध करण्यात येते. सध्या साडेतीन एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. मात्र हे पाणी नाल्यात सोडून देण्यात येते. त्यामुळे या पाण्याचा काही लाभ होत नाही. या पाण्यावर शेकडो हेक्टर जमिन ओलीताखाली येवू शकते. सिंचन विभागाने याबाबत कार्यवाही करावी. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. सिंदखेड राजा विकास आराखड्यासंदर्भात आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले, आराखड्यातंर्गत सुरू असलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू दिल्या जाणार नाही. राज्य पुरातत्व विभाग व केंद्रीय पुरातत्व विभागाने समन्वयाने या ऐतिहासिक स्थळाचा विकास करावा. राजे लखुजी जाधव समाधी, निळकंठेश्वर मंदीर, सजना बारव, मोती तलाव आदींचे काम पूर्ण करावे.केंद्रीय पुरातत्व विभागाकडे कामे हस्तांतरीत केल्यास त्यांनी ती पूर्ण करावी. त्याचप्रमाणे गावातील अंतर्गत पाणी वितरण व्यवस्था बळकटीकरणाचे काम पूर्ण करावे.ते पुढे म्हणाले, लोणार विकास आराखड्यातंर्गत सरोवरातील पाण्याचे झिरे तपासणे, सासु सुनेची विहीर स्वच्छ करणे, आदी कामे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे दिली आहे. त्याचप्रमाणे वन्य जीव विभागाने लोणार अभयारण्यातील सरोवरातील वेडी बाभूळ काढण्याचे काम नियमानुसार पूर्ण करावे. संत चोखामेळा जन्मस्थानासाठी देण्यात आलेल्या निधीतून कामे पूर्ण करावी, अशा सुचानाही त्यांनी दिल्या. याप्रसंगी संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पंडीत दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभपंडीत दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानातंर्गत शिधापत्रिका व गॅस जोडणी वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री संजय कुटे, जि. प. अध्यक्षा उमाताई तायडे, आ. डॉ शशिकांत खेडेकर, आ. हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक पी. मांगीलाल, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्लाळे आदी उपस्थित होते. धुरयुक्त स्वयंपाक गृहामुळे गृहीणींमध्ये श्वसनाचे आजार वाढत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, गॅस जोडणीमुळे स्वयंपाक घर धुरमुक्त होते. त्यामुळे गृहीणींना श्वसनांच्या विकारांना बळी पडावे लागत नाही. पं. दिनदयाल उपाध्याय अभियानातंर्गत पात्र महिलांना नाममात्र दरात गॅस एजन्सीकडून गॅस जोडणी देण्यात येणार आहे. पात्र कुटूंबांना शिधापत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे. वितरण मोहिम स्वरूपात करायचे आहे. शासनाने यासाठी १५ आॅगस्टची मुदत दिली आहे. कुठलाही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहू नये, याकरीता स्वस्त धान्य दुकानदारांनी सहकार्य करावे. जिल्ह्यात अंत्योदय योजनेमध्ये ६५ हजार ९९८ कार्डधारक असून ३ लक्ष ७ हजार ३ लाभार्थी आहेत. तसेच प्राधान्य कुटूंबांमध्ये ३ लक्ष २२ हजार ७३५ कार्डधारक आहेत. यामध्ये लाभार्थी संख्या १४ लक्ष ८४ हजार ९५५ आहे. ईपॉस मशीनच्या माध्यमातून दुकानातून धान्याचे वितरण होत आहे. शिधापत्रिकांना आधारशी संलग्न करण्यात आले आहे. यामुळे बोगस कार्डधारक बाहेर आले, परिणामी त्यांना जात असलेल्या धान्याची बचत झाल्याचे, कुटे म्हणाले.