बुलडाणा : देऊळगावराजा शहरातील पाणी पुरवठा योजनेची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने येत्या २० मार्चपर्यंत सुधारित प्रस्ताव सादर करावा, त्याला शासन स्तरावर तातडीने मंजुरी देण्यात येईल, त्यानंतर या योजनेची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून शहराला पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी गुरुवारी संबंधित अधिका-यांना दिले.पाणी पुरवठा संदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत लोणीकर बोलत होते. त्यावेळी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, देऊळगावराजाच्या नगराध्यक्ष सुनीता शिंदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (एमजेपी) सदस्य सचिव संतोषकुमार, देऊळगावराजाचे मुख्य अधिकारी प्रमोद कानडे, एमजेपीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुमारे ३२ हजार लोकसंख्या असलेल्या देऊळगावराजा शहरासाठी महाराष्ट्र सुजल निर्मल अभियानातून पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेसाठी सुमारे १३ कोटी २१ लाख रुपये इतक्या ढोबळ किमतीच्या भांडवली कामास तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. शासनामार्फत आतापर्यंत १० कोटी ६६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.पालिकेने सहभागाची रक्कम जमा केली आहे. या योजनेचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, काही कामे बाकी आहेत. यासंदर्भात तसेच उर्वरित निधी मिळून ही कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी एमजेपीने येत्या पाच दिवसांत कामे मार्गी लावण्याच्या सूचना लोणीकर यांनी दिल्या.
उंद्री योजनेचाही आढावाबुलडाणा जिल्ह्यातील उंद्री गावासाठी पाणी पुरवठा योजना सुरू करण्याबाबतही आढावा घेण्यात आला. आमदार राहुल बोंद्रे यावेळी उपस्थित होते. टंचाई निवारण निधीमधून किंवा इतर निधीतून या गावाच्या योजनेसाठी प्रस्ताव देण्यात यावा, असे लोणीकर यांनी यावेळी सांगितले.