येथील संजय देवल यांच्या निवासस्थानी असलेल्या सभागृहात छोटेखानी बासरी वादनाची मैफील पार पडली. मूळचे बुलडाण्याचे असलेले, पण आता नवी मुंबई येथे राहणारे महेश भालेराव यांनी केलेल्या बासरी वादनाने संगीतरसिक भारावून गेले. बुलडाण्यातील संगीत गुरू स्व. अण्णासाहेब बर्दापूरकर व स्व. रा. गो. टाकळकर गुरुजी यांना शिक्षक दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी या विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. महेश भालेराव सध्या गुरू पंडित राजेंद्र कुळकर्णी यांच्याकडे बासरी वादनाचे धडे घेत आहेत. त्यांनी यमन रागाने मैफलीची सुरुवात केली. शास्त्रीय संगीतातील रागदारी सोबत सुपरिचित मराठी, हिंदी गीतांनी ही मैफील रंगविली. रसिकांनी या मैफलीला मनसोक्त दाद दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत शिक्षक अरविंद टाकळकर यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय देवल यांनी केले. आनंद साबदे, डॉ. राठी यांच्यासह कोरोनाचे नियम पाळत अगदी मोजके रसिक श्रोते या मैफलीला उपस्थित होते. महेश भालेराव यांच्या सोबत नवोदित तबला कलाकार चेतन पाटील याने साजेशी तबला साथ केली. या मैफलीच्या आयोजनासाठी एडेड हायस्कूल माजी विद्यार्थी महासंमेलन समितीचे सदस्य श्रीकांत देशपांडे, मनोज बुरड, आनंद संचेती, रविकिरण टाकळकर यांनी पुढाकार घेतला होता.
एडेडमध्ये रंगली बासरी वादनाची मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:41 AM