एसटी महामंडळातर्फे १ ते १५ डिसेंबरपर्यंत विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्ह्यातील सातही आगारांतर्गत हे अभियान प्रत्येक दिवशी चांगल्या प्रकारे राबविण्यात आले. परंतु देऊळगाव राजा, मेहकर याठिकाणी बसस्थानक इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी वरचेवरच झाली. बांधकामामुळे धुळीचे प्रमाण वाढले असून, त्याचठिकाणी प्रवाशांना उभे राहावे लागत आहे. बसची प्रतीक्षा करत असताना प्रवाशांना धुळीचाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सिंदखेड राजा येथील बसस्थानकाचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. याठिकाणची इमारत चकाकत आहे. परंतु परिसरातील अस्वच्छता वाढली आहे. अनेक नागरिक याठिकाणी उघड्यावर शाैचास जात असल्याने त्याचा त्रास प्रवाशांना सोसावा लागतो. बुलडाणा येथील बसस्थानकाचीही आता दुरवस्था होत असल्याचे चित्र आहे. याठिकाणी वराहांचा वावर वाढल्याने प्रवाशी त्रस्त झाले आहेत. हे वराह स्वच्छतागृह परिसरातून थेट बसस्थानकात शिरतात. वराहांच्या या त्रासामुळे प्रवाशांनी अनेकवेळा एसटी महामंडळाकडे तक्रार केली आहे.
शाैचालये अस्वच्छच!
प्रत्येक बसस्थानकावर शाैचालये चांगल्या स्थितीमध्ये आहेत. परंतु ते अस्वच्छ राहत असल्याने प्रवाशी त्याठिकाणी जाणे टाळतात.
बुलडाणा येथील बसस्थानकामध्ये शाैचालय असूनही काही प्रवाशी बाहेर उघड्यावरच जातात. बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच अस्वच्छता दिसून येते.
मेहकर येथील बसस्थानकाच्या बांधकामासाठी पूर्ण इमारत पाडण्यात आलेली आहे. परंतु अद्याप नवीन बांधकाम सुरू झालेले नाही. याठिकाणच्या शाैचालयात अत्यंत दुर्गंधी असते.
वराहांचा मुक्त संचार; प्रवाशांना त्रास
बुलडाणा येथील बसस्थानकामध्ये येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यामुळे बसस्थानकामध्ये वराहांचा मुक्त संचार आहे. वराहांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. यापूर्वी वराहांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात नगरपालिकेकडे दोन वेळा तक्रार करण्यात आलेली आहे.
१ ते १५ डिसेंबर या कालावधीमध्ये बसस्थानकामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. बसस्थानकाला आत येण्याचे मार्ग जास्त आहेत. त्यामुळे वराह बाहेर काढल्यानंतरही येतातच. वराहांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपालिकेला कळविले आहे.
- दीपक साळवे,
स्थानकप्रमुख, बुलडाणा.
बसस्थानकाची स्थिती वाईटच आहे. बसेसचे वेळेवर निर्जंतुकीकरण करण्यात येते. परंतु बसस्थानकातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. स्वच्छता पंधरवड्यादरम्यान बसस्थानकात स्वच्छता दिसून आली. परंतु आता परत अस्वच्छता वाढण्यास सुरुवात झाली आहे.
- योगेश चंदन, प्रवासी
बसस्थानकात स्वच्छता दिसून आली. परंतु वराहांचा त्रास जास्त आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकामध्ये प्रवाशी नियमांचे पालनही करत नाहीत. बसेसमध्येही विनामास्क प्रवाशी व चालक-वाहक असतात. त्यामुळे बसस्थानकात व बस प्रवासाची भीती वाटते.
- वैष्णवी बाहेकर, महिला प्रवासी