सिंदखेडराजा: राज्यातील आघाडीप्रमाणेच सिंदखेडराजा नगरपालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता आहे. पालिकेत विरोधी बाकावर बसणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आता सत्तापक्ष म्हणून पालिकेच्या कारभारात लक्ष देतील, असे चित्र येत्या काही दिवसांत शहरवासियांना पहावयास मिळाल्यास नवल वाटू नये. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासोबतच बैठक झाली असून या बैठकीला शिवसेना पदाधिकाऱ्यांची हजेरी असल्याची माहिती आहे.
सिंदखेडराजा पालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात थेट लढत होती. अध्यक्षपदी शिवसेनेचे सतीश तायडे निवडून आले. १७ सदस्य असलेल्या पालिकेत सेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी आठ सदस्य निवडून आले. तर एक सदस्य अपक्ष होता. अध्यक्ष निवडल्या गेल्याने पालिकेत शिवसेनेची सत्ता स्थापन झाली. तेव्हापासून राष्ट्रवादीने विरोधकांच्या भूमिकेत आपले काम सुरू ठेवले. दुसरीकडे शिवसेनेतील काही नगरसेवक आघाडीच्या बाजूने नसल्याचे चित्र होते. मुख्यमंत्री शिवसेनेचे असल्याने निधी मिळण्यात कोणतीच अडचण असणार नाही, असा विश्वास सेना कारभाऱ्यांना होता. परंतु, प्रत्यक्ष आलेल्या निधीवरून दबक्या आवाजात श्रेयवादाची लढाई सुरूच राहिली. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या परिवार संवाद कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी नगरसेवक यांच्यातील नाराजी स्पष्ट जाणवली. डॉ. राजेंद्र शिंगणे पालकमंत्री असतानाही पालिकेतील सत्तास्थान का मिळत नाही, असा प्रश्न केवळ राष्ट्रवादी नगरसेवकांनाच नाहीतर सामान्य नागरिकांना होता. पक्षांतर्गत वाढती नाराजी लक्षात घेवून ॲड. नाझेर काजी यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना अवगत केले होते. डॉ. शिंगणे यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती असून आघाडीबाबतची महत्त्वपूर्ण बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. काही अटी, शर्थीसह नगरपरिषदेत आघाडी शक्य असल्याचे बोलले जाते. त्यामुळे येत्या काही दिवसांत पालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता आहे.
पंचायत समिती कनेक्शन
पालिकेत ही आघाडी होण्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाला पंचायत समितीतील उपसभापतीपद शिवसेनेला द्यावे लागण्याची शक्यता आहे. सध्या सभापती आणि उपसभापती ही दोन्ही पदे राष्ट्रवादीकडे आहेत. पंचायत समितीतील बदलाच्या पार्श्वभूमीवर खा.जाधव, माजी आमदार खेडेकर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.